नाशिक - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिकमध्ये उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा भाजप सरकारच्या फोडाफोडीच्या धोरणाला आणि नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारी व भ्रष्टाचाराविरोधात असल्याचं सांगण्यात आले. हजारो कार्यकर्त्यानी या विराट मोर्चाला हजेरी लावली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नंदगांवकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. नाशिक महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था हा मोर्च्यातील मुख्य मुद्दा उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
हा संयुक्त मोर्चा शहरातील प्रमुख चौकांमधून काढण्यात आला, ज्यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पहिल्यांदाच एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या आंदोलनात मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या पक्षातून माणसं जमवण्याचं काम भाजपा करतंय. परंतु आम्ही सगळे मराठी म्हणून एकत्र आलोय. ज्या नाशिकला दत्तक घेतले त्याला काय मिळाले, रस्त्यावर खड्डे, कायदा सुव्यवस्था बिघडला. केंद्रापासून गल्लीपर्यंत तुमचे सरकार आहे. नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम भाजपाने केले. खोटारडेपणाचा कळस जनतेच्या एकजुटीमुळे उघडा पडेल. दोन भाऊ एकत्र आलेत, जनता त्यांच्यामागे उभी आहे. आम्ही सगळे एक आहोत. हा मोर्चा फक्त सुरूवात आहे. नाशिकच्या पावनभूमीतून सुरू झालेला हा मोर्चा आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात काढला जाईल असं त्यांनी सांगितले.
तर नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली आहे. युवकाचा खून करून आरोपी पालकमंत्र्यांना भेटायला जातो. या शहरात ४० खून झाले. जमिनी लुबाडण्यासाठी हत्या केल्या जात आहेत. हा मोर्चा सुरुवात आहे. यापुढे नाशिकमध्ये नाही तर महाराष्ट्रात संयुक्त मोर्चा होणार आहे. २ भाऊ एकत्र आले. २ नेते एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे यापुढे जनता ठाकरेंच्या मागे जाईल. आमच्या सगळ्यांचा मायबाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. त्यामुळे यापुढे आमच्याशी सामना करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. महापालिकेत जिल्हा परिषदा असतील तिथे परिवर्तन करावे लागेल. या जनआक्रोश मोर्चातून आपण आव्हान उभे केले आहे. ते आव्हान टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं खासदार संजय राऊत यांनी सांगत भाजपाला इशारा दिला.
कशासाठी काढला मोर्चा?
मोर्च्यात मुख्यतः नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत शहरात ४० हत्या झाल्या असून, कोयता गँगच्या कारवाया, वाहनांची तोडफोड, महिलांवरील अत्याचार, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय, ड्रग्स विक्री, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पाण्याची टंचाई ही प्रमुख समस्या आहेत. महानगरपालिकेतील जमीन अधिग्रहण प्रक्रियेत भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्पातील अनियमितता आणि शहरातील खड्ड्यांची समस्या यावरही तीव्र भाष्य करण्यात आले.