नाशिकमध्ये वाइन शॉप फोडून चोरांकडून ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी; ३८ हजारांची विदेशी दारू रिचविली

By अझहर शेख | Updated: January 1, 2024 16:38 IST2024-01-01T16:37:35+5:302024-01-01T16:38:20+5:30

शरणपूर रोडवरील कुलकर्णी उद्यानाजवळ असलेले वाइनचे दुकान अज्ञात चोरांनी शनिवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.

Thirty first party by thieves after breaking into wine shop in Nashik;38 thousand worth of foreign liquor was theft | नाशिकमध्ये वाइन शॉप फोडून चोरांकडून ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी; ३८ हजारांची विदेशी दारू रिचविली

नाशिकमध्ये वाइन शॉप फोडून चोरांकडून ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी; ३८ हजारांची विदेशी दारू रिचविली

अझहर शेख, नाशिक : सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शरणपूर रोडवरील कुलकर्णी उद्यानाजवळ असलेले वाइनचे दुकान अज्ञात चोरांनी शनिवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानातून विदेशी दारूच्या बाटल्यांसह रोख रक्कम लांबवून रविवारी थर्टी फर्स्ट साजरी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शरणूपर रोड परिसरातील एका वाइनच्या दुकानाचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील महागड्या ब्रॅण्डच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांवर डल्ला मारून गल्ल्यातील ४८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शैलेंद्र शंकरराव कडवे (४७, रा. अभोणकर लेन, रविवार पेठ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरांनी सुमारे ३८ हजारांची दारू गायब करून नववर्षाची ओली पार्टी रंगविल्याची चर्चा आहे. या दुकानफोडीप्रकरणी येथील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. यावरून पोलिस सुगावा लावून संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत. याबाबत गुन्हे शोध पथकालाही सूचना देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Thirty first party by thieves after breaking into wine shop in Nashik;38 thousand worth of foreign liquor was theft