शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:51 IST2018-01-27T13:38:10+5:302018-01-27T13:51:35+5:30
मोठ्या संख्येने शिवसैनिक जमताच ठिय्या आंदोलत तीव्र झाले. त्यामुळे द्वारकेवर एकत्र येणा-या या रस्त्यांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. दुपारी बारा वाजता पोलिसांनी आंदोलन चिरडत आंदोलकांना वाहनात डांबले.

शिवसेनेचा द्वारकेवर ठिय्या : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’
नाशिक : ‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’, ‘कहां गये अच्छे दिन’, ‘ हिंदू-मुस्लीम, सीख-ईसाई सबके घर पुहंची महंगाई’ असे विविध घोषवाक्य लिहिलेले काळे फलक व भगवे झेंडे हातात घेऊन द्वारकेवर भाजपा सरकारच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र आले. शिवसैनिकांनी येथे ठिय्या आंदोलन करत सुमारे तासभर ‘द्वारका’ रोखली.
पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅसच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे; मात्र भाजपा सरकारला याबाबत काहीही देणेघेणे नसून दररोज होणारी इंधनाची दरवाढ थांबवावी, पेट्रोल, गॅसचे दर कमी करावे या मागणीसाठी शहर-जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.२७) द्वारकेवर सकाळी अकरा वाजता ठिय्या व घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, डी.जे.सुर्यवंशी, सुर्यकांत लवटे, सुधाकर बडगुजर, श्याम साबळे, दिलीप दातीर,महिला आघाडीच्या शालीनी दिक्षित, वाहतुक सेनेचे शिवाजी भोर, विद्यार्थी सेनेचे योगेश बेलदार, उमेश चव्हाण, माजी नगरसेवक संजय चव्हाण आदि पदाधिका-यांसह शेकडो शिवसैनिकांनी द्वारकेवरील सर्व रस्त्यांच्या प्रारंभी ठिय्या देत वाहतूक पुर्णपणे रोखली.