नाशिकरोड : रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाच्याच मोबाइलवर चोरट्याने डल्ला मारल्याने शहरात पोलीसच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मितुल अशोक सावजी यांचा मोबाइल चोरट्याने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सावजी काम आटोपून त्यांच्या बॅरेकमध्ये आले. यावेळी त्यांचा मित्र करण यादव याने वाढदिवसानिमित्त भेट दिलेला मोबाइल बॅगमध्ये पाहिला असता त्यांना तो मिळाला नाही. त्यांनी याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सावजी यांनी दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासादरम्यान हा मोबाइल औरंगाबाद येथील शोएब सलीम पठाण (२४, रा. मकबराच्या पाठीमागे, इब्राहिम शहा कॉलनी, औरंगाबाद) याने चोरल्याचा संशय आला. शोएब पठाण याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणून त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सावजी यांचा चोरीस गेलेला मोबाइल मिळून आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
चोरट्याने चक्क पोलिसाच्याच मोबाइलवर केला हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST