मित्राला भेटून घरी जाताना भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाने गमावले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:52 IST2025-03-29T18:51:26+5:302025-03-29T18:52:05+5:30
ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सागर हा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला.

मित्राला भेटून घरी जाताना भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तरुणाने गमावले प्राण
Nashik Accident: नाशिक शहरातील गांधीनगरमध्ये मित्राला भेटून दुचाकीवरून नाशिक-पुणे महामार्गावर वळण घेत द्वारकाच्या दिशेने जाणाऱ्या जेलरोड पंचक येथील दुचाकी चालकाला ट्रकचालकाने धडक दिल्याने युवक ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक अर्धा ते एक तास खोळंबली होती.
जेलरोड, पंचक, अयोध्यानगर येथील मोहन दर्शन अपार्टमेंट राहणारा सागर यशवंत हिरे हा तरुण शुक्रवारी दुपारी गांधीनगर येथे मित्राला भेटण्यासाठी गेला होता. मित्राला भेटून सागर हा आपल्या दुचाकीवरून गांधीनगर गेटमधून बाहेर पडून द्वारकेच्या दिशेने वळत होता. त्याच वेळी नाशिकरोडकडून द्वारकेकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सागर हा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला.
दरम्यान, याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.