मनपा क्षेत्रातील २३ प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:26 AM2020-01-01T01:26:12+5:302020-01-01T01:27:16+5:30

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतर नाशिक मनपा क्षेत्रातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील २३ शिक्षकांची सेवा मंगळवारी (दि.३१) समाप्त झाली आहे.

Termination of service of 3 primary teachers in Municipal area | मनपा क्षेत्रातील २३ प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त

मनपा क्षेत्रातील २३ प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त

googlenewsNext
ठळक मुद्देटीईटी अनुत्तीर्णतेचा फटका आकडा वाढणार असल्याने शिक्षण संस्थांसमोर पेच

नाशिक : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतर नाशिक मनपा क्षेत्रातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील २३ शिक्षकांची सेवा मंगळवारी (दि.३१) समाप्त झाली आहे.
या शिक्षकांनी ३० मार्च २०१९ पूर्वीच टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असताना सदर शिक्षक अजूनही सेवेत आहेत. अशा शिक्षकांना केंद्र्र सरकारने दणका दिला आहे. अशा टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे स्पष्ट आदेश दिले असून प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबतचे परिपत्रक मनपा व जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार मनपा शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी शहरातील सर्व खासगी अनुदानित व विनाअनुदानित संस्थांना संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीईटी) राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच २०१५ मध्ये केंद्र सरकारने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी चार वर्षांची मुदतवाढ दिल्याने राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार ३० मार्च २०१९ पर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एप्रिल महिन्यात संबंधित शिक्षकांचे वेतन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, राज्य सरकारने आपल्याच निर्णयावरून घूमजाव करीत संबंधित शिक्षकांवरील कारवाई टाळली होती आणि संबंधित शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आणखी एक संधी द्यावी यासाठी पत्र पाठविण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने केंद्रीय मानव विकास व संसाधन मंत्रालयास पत्रही पाठवले होते. परंतु, संबंधित मंत्रालयाने टीईटी अनुतीर्ण शिक्षकांना अपेक्षित संधी देण्यात आल्या असून, यापुढे त्यांना कोणतीही वाढीव संधी न देता त्यांच्या सेवा समाप्त कराव्यात, असे स्पष्ट आदेश ३ जून २०१९ रोजी दिले आहेत. परंतु, अद्याप अशा शिक्षकांवर कोणतीही कारवाई होऊ शकलेली नव्हती. अखेर प्राथमिक शिक्षक संचालनालयाने एनसीटीईच्या निकषांना अनुसरून सर्व जिल्हा परिषद व मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
आकडा वाढण्याची शक्यता
शासनाने २०१२ पासून शिक्षक भरतीच केलेली नसल्याने शासकीय शाळांमध्ये असे शिक्षक असण्याची शक्यता नाही. परंतु, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांनी मागील अनुशेष भरून काढण्यासाठी काही शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या निर्णयामुळे अशा शिक्षकांवर सेवा समाप्तीच्या नामुष्कीचे संकट ओढावले आहे. यात मनपा क्षेत्रातील प्राथमिक शाळांमधील २३ शिक्षकांची आकडेवारी समोर आली असली तरी अद्याप शहरातील खासगी संस्थांमधील तसेच ग्रामीण भागातील खासगी पहिली ते आठवीच्या शिक्षकांचा आकडा समोर आलेला नाही. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्णतेमुळे सेवा समाप्त होणाºया शिक्षकांचा आकडा आणखीनच वाढणार असल्याने खासगी शिक्षण संस्थांसमोर पेच निर्माण झाला आहे.
अल्पसंख्याक शाळांना सूट
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबत घेतलेल्या निर्णातून अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातील संस्थाचालकांमध्ये नाराजी आहे. अल्पसंख्याक शाळांमध्येही अशा शिक्षकांची नियुक्ती असून, अशा संस्थांना या निर्णयातून वगळून शासनाने पक्षपाती निर्णय घेतल्याचे मत व्यक्त करीत संस्थाचालकांकडून प्रकरणात नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Termination of service of 3 primary teachers in Municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.