जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:25 IST2025-01-06T11:19:40+5:302025-01-06T11:25:01+5:30

ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला वाचण्यासाठी तपोवन एक्सप्रेस ७०० मीटर मागे घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Tapovan Express turned back 700 meters to pick up a passenger who fell off the train | जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण...

जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण...

Tapovan Express : मनमाड जंक्शनजवळ शनिवारी मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ७०० मीटर उलटी चालवल्याची घटना समोर आली आहे. कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे  गाडी चुकून विरुद्ध दिशेने जाऊ गेली नाही. जखमी प्रवाशाचा जीव वाचवता यावा म्हणून गाडी रिव्हर्स घेण्यात आली होती. मात्र, जखमी प्रवाशाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. प्रवाशाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात असताना अशाप्रकारे एक्स्प्रेस गाडी रिव्हर्स घेण्याची ही घटना क्वचितच घडली आहे.

डब्यातून खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्यासाठी रेल्वेने अर्धा किलोमीटरहून अधिक मागे घेतल्याने माणुसकीचे अनोखे उदाहरण समोर आलं आहे. मात्र दुर्दैवाने, ज्या जखमी प्रवाशासाठी ट्रेनने आपली दिशा बदलली आणि मागील अनेक गाड्यांवर परिणाम झाला, त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृ्त्तानुसार मनमाड स्थानकाच्या जवळ हा सगळा प्रकार घडला.

सरवर शेख असे कोचमधून पडलेल्या प्रवाशाचे नाव होतं. उत्तर प्रदेशातील शेख ३० वर्षांचा होता. तपोवन एक्स्प्रेस गाडी मनमाड जंक्शनला आल्यानंतर तो डब्यातून खाली पडला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या लोको पायलटने कंट्रोलरची परवानगी घेतली आणि जखमी प्रवाशाला उचलण्यासाठी ट्रेन रिव्हर्स घेतली.

शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. शेख खाली पडल्यानंतर काही प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली होती. ट्रेन गार्ड एस एस कदम यांना प्रवाशांकडून समजले की एक तरुण तिसऱ्या डब्यातून खाली पडला आहे. कदम यांनी लोको पायलट एमएस आलम यांच्याशी संपर्क साधला. नंतर आलमने नियंत्रकाशी संपर्क साधून मागे जाण्याची परवानगी मागितली. गाडी मनमाड स्थानकापासून अर्धा किमी पुढे आली होती. 

यानंतर तपोवन एक्स्प्रेसच्या मागून येणारी मालगाडी एका स्थानकावर अगोदर थांबवण्यात आली, जेणेकरून गाडीसाठी जागा मिळेल. ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांच्या मदतीने शेखचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर ट्रेन मनमाड स्थानकावर पोहोचली. तोपर्यंत शेख यांना रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. त्याला रुग्णालयात नेल्यानंतर गाडी नांदेडकडे निघाली. मनमाड स्थानकात रेल्वे पोहोचल्यानंतर शेखला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्याने शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

Web Title: Tapovan Express turned back 700 meters to pick up a passenger who fell off the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.