साईभक्तांना टँकरची धडक; दोघांचा मृत्यू, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:33 IST2020-12-26T20:36:24+5:302020-12-27T00:33:51+5:30
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहेत. मुंबईतील इराणीवाडी, कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना शनिवारी (दि.२६) पहाटे टँकरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे साईभक्त ठार झाले तर जखमी झालेल्या चार साईभक्तांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान टँकरचालक फरार झाला असून घोटी सिन्नर महामार्गावर घोटीपासून ३ किमी अंतरावर देवळे गावाजवळ बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या साईभक्तांची पालखी घोटीजवळ मुक्काम करून शनिवारी पहाटे शिर्डीकडे मार्गस्थ झाली होती. पालखी पुढे जात असताना जवळच बंद पडलेल्या पेट्रोलपंपापजवळ मागून येणाऱ्या टँकरने (क्रमांक एमएच ४६ / बीएफ ४५१४) पालखीतील साईभक्तांना जोराची धडक दिली. ही घटना लक्षात येताच अनेक साईभक्तांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या तर अनेकजण धडकेमुळे गंभीर जखमी होऊन रस्त्यात पडून होते. यात राजकुमार राजेंद्र पटेल नामक साईभक्त जागीच ठार झाला तर अशोक अच्छेलाल गुप्ता हे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना मरण पावल्याचे वृत्त आहे.
अज्ञात चालकांविरूद्ध गुन्हा दाखल
अपघाताचे वृत्त समजताच मागून वाटचाल करणारे साईभक्त व महामार्गावरील वाहनचालकांनी धाव घेऊन जखमी भक्तांना घोटी ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. त्यात अलोक गुप्ता, अनिकेत देसाई, आशिष कांजारीया, राहुल पाटील हे जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घोटी पोलिसांनी गणेश लालजी सरोज रा. मालाड यांच्या फिर्यादीवरून अपघात करून फरार झालेल्या अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस करीत आहेत.