स्वस्ताईमुळे संक्रांतीचा गोडवा

By Admin | Updated: January 8, 2017 01:26 IST2017-01-08T01:26:00+5:302017-01-08T01:26:14+5:30

समाधान : किराणा बाजारात मालाचे उतरले दर

The sweetness of the sankranti due to cheapness | स्वस्ताईमुळे संक्रांतीचा गोडवा

स्वस्ताईमुळे संक्रांतीचा गोडवा

नाशिक : चांगले पाऊसपाणी, भरपूर उत्पन्न आदि कारणांमुळे किराणा बाजारात सध्या बऱ्यापैकी भाव उतरल्याचे चित्र दिसत आहे. इतर धान्यांबरोबरच जवळच येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीचा गोडवा वाढविणारी आनंदाची बातमी म्हणजे तिळाचे भाव दुपटीने कमी झाले असून, यंदा सर्वांना एकमेकांना गोड गोड बोलण्याच्या शुभेच्छा देताना अधिक आनंद होणार आहे.
मागील वर्षी २०० ते २१५ रुपये असलेले तीळ यंदा १०० ते १२० रुपये किलो दराने मिळत आहे. त्यात गावठी तीळ १०० ते १२०, पॉलिश तीळ १४० रुपये किलो या दराने मिळत आहे. गूळ मात्र यंदा ५ ते ८ रुपयांनी महागला असून, मागील वर्षी तो ५२ रुपये किलो होता. सध्या गूळ ५८ रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. साधा, चिक्कीचा गूळ पावशेर, अर्धा किलो, एक किलोच्या ढेपेत उपलब्ध आहे. गुळाबरोबरच साखरही यंदा थोडी महाग झाली आहे. मागील वर्षी ३४ ते ३५ रुपये किलो दराने मिळणारी साखर यंदा ३९ रुपये किलो दराने मिळत आहे. साखरेबरोबरच साजूक तुपाचाही भाव ४९० रुपये किलोपासून कंपन्यांप्रमाणे तुपाचे भाव बदलत आहे. पांढरा व रंगीबेरंगी हलवा २० ते ३० रुपये पावशेर दराने उपलब्ध आहे. बाजारपेठेत संक्रांतीच्या साहित्याची थोड्या प्रमाणात रेलचेल पहायला मिळत आहे. तिळगुळाचे तयार लाडू व वड्याही बाजारात दाखल झाल्या असून, अर्धा किलोच्या पॅकेटची किंमत ९० ते १०० रुपये अशी आहे. रेवड्या १४० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. मकरसंक्रांतीला मुगाची खिचडी, गूळपोळी, बाजरीच्या भाकरीचे महत्त्व असते. याशिवाय तिळाचे उटणे, तिळाचे तेल, तिळाची भाकरी केली जाते. सुगड्यातून हरबरे, गाजर, गव्हाच्या ओंब्या, उसाची कांडी, बोर आदिंचे दान दिले जाते. सध्या या साऱ्या गोष्टी अर्थात भाजीपाला, डाळी, तांदूळ, शेंगदाणे, तेल, तूप, कडधान्य साऱ्यांचे भाव बऱ्यापैकी कमी झाले असल्याने सध्या जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा स्वस्ताईसह मकरसंक्रांती साजरी करण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे.

Web Title: The sweetness of the sankranti due to cheapness