स्विडनचा अभियंता सायकलवर स्वार; दहा महिन्यांत ओलांडल्या १७ देशांच्या सीमा
By Azhar.sheikh | Updated: May 9, 2018 15:43 IST2018-05-09T15:38:58+5:302018-05-09T15:43:04+5:30
स्वीडन देशाचा रहिवाशी असलेला व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण आपल्या सायकलींगच्या छंदापोटी चक्क जगभ्रमंतीला निघाला आहे. त्याने तीनशे दिवसांत १७ देशांच्या सीमा ओलांडल्या असून भारतात दाखला झाला आहे.

स्विडनचा अभियंता सायकलवर स्वार; दहा महिन्यांत ओलांडल्या १७ देशांच्या सीमा
नाशिक : ‘हा छंद जीवाला लावी पिसे’ असे एका गीतकाराने म्हटले आहे, ते उगीच नाही. एखादा छंद जेव्हा माणसाला जडतो तेव्हा त्या छंदासाठी तो सर्व काही पणाला लावतो. स्वीडन देशाचा रहिवाशी असलेला व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण आपल्या सायकलींगच्या छंदापोटी चक्क जगभ्रमंतीला निघाला आहे. त्याने तीनशे दिवसांत १७ देशांच्या सीमा ओलांडल्या असून भारतात दाखला झाला आहे.
स्वीडन येथील लिनस हा २९ वर्षांचा तरुण दहा महिन्यांपुर्वी सायकलने स्विडनमधून जगभ्रमंतीसाठी निघाला. त्याने आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात पाच दहा नव्हे तर १७ देशांच्या सीमा यशस्वीरित्या ओलांडल्या आहेत. भारत हा त्याचा १८वा क्रमांकाचा देश ठरला. संपुर्ण अभ्यास, आरोग्याच्या दृष्टीने आहार, आराम आणि सायकलिंगचे दिवसाचे किलोमीटर असा सर्व शास्त्रोक्त तंतोतंत नियोजनानुसार लिनस जगभ्रमंती सायकलवरुन करत आहे. यामागे त्याचा केवळ छंद असून कुठलाही विक्रम किंवा प्रसिध्दी मिळविण्याच्या उद्देशाने तो सायकलभ्रमंती करीत नाही. भारतात दाखल झाल्यानंतर त्याने इंटरनेटच्या माध्यमातून मिळविलेल्या नाशिकमधील लेखानगर भागातील दिलासा केअर सेंटर या वृध्दाश्रमात दोन दिवस स्वयंस्फूर्तीने मुक्काम केला. येथील आजी-आजोबांसोबत गप्पागोष्टी करत तो चांगलाच रमला. दोन दिवसांचा मुक्काम पुर्ण करुन मंगळवारी (दि.८) त्याने मालेगावच्या दिशेने सायकल दामटविली. खाण्यापिण्याचे सामान, कपडे, बुट असा सर्व लवाजमा असलेल्या बॅग रेंजरप्रकारच्या सायकलवर टांगून तो जगभ्रमंती करीत आहे. शरीरयष्टीने उंचपुरा धडधाकट असलेला लिनस सायकलवरुन जग फिरत आहे.
पुढील चार वर्षे सायकलवरच
लिनस हा त्याच्या मायदेशी पुढील चार वर्षानंतर परतणार आहे. तोपर्यंत त्याचे आयुष्य हे सायकलच्या चाकांवरच फिरणार आहे. भारतासह १८ देशांची भ्रमंती पूर्ण के ल्यानंतर लिनस नेपाळच्या सीमेमध्ये प्रवेश करणार आहे. भारतामध्ये त्याला अधिवासासाठी ६० दिवसांचा व्हिसा मिळाला आहे. तोपर्यंत तो महत्त्वाच्या शहरांमधून मार्गस्थ होत प्रसिध्द ठिकाणांना भेटी देत नेपाळ सीमेत दाखल होणार आहे.
भारत हा सुंदर देश असल्याचे मला जाणवले. भारताच्या सीमेत दाखल झाल्यानंतर एक वेगळ्याप्रकारचा मी अनुभव घेतला. बलाढ्य लोकशाही असलेला आणि वैविध्यपुर्ण भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी मला ६० दिवसही अपुरे पडणार.
-लिनस, छंदवेडा सायकलपटू