भयंकर! 20 लाखांसाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या; महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:41 IST2022-05-07T15:32:42+5:302022-05-07T15:41:36+5:30
पंचवटी : नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणावेत यासाठी पती व सासूने वारंवार मानसिक व शारीरिक छळ ...

भयंकर! 20 लाखांसाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या; महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार
पंचवटी : नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये आणावेत यासाठी पती व सासूने वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून व्हॉट्सॲपवरील संभाषणाची हास्यास्पद इमोजी पाठवून नवविवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या पती, सासूवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात विवाहितेला शारीरिक, मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेचे वडील ज्ञानेश्वर शेना धनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मयत विवाहितेचा पती धनंजय संतोष धनगर आणि सासू संगीता संतोष धनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मखमलाबाद रोडवर गोकूळनगरला राहणाऱ्या श्रद्धा धनंजय धनगर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मयत श्रद्धा व जळगावचा संशयित आरोपी धनंजय धनगर या दोघांचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती व सासू यांनी नवीन ऑफिस घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणावे, अशी मागणी केली होती. पैसे आणत नसल्याने श्रद्धा यांचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करीत उपाशी ठेवले व व्हॉट्सॲप संभाषणाची हास्यास्पद इमोजी पाठविली. अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून आठवड्यात श्रद्धा धनगर माहेरी निघून गेली होती. त्यावेळी झालेल्या प्रकाराबाबत तिने कुटुंबीयांना माहितीही होती. अखेर दोन दिवसांपूर्वी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.