राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे तरुण तडफदार ३८९ 'पीएसआय'; पार पडला शपथविधी
By अझहर शेख | Updated: December 24, 2025 18:34 IST2025-12-24T18:34:14+5:302025-12-24T18:34:45+5:30
१२ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वी..!

राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे तरुण तडफदार ३८९ 'पीएसआय'; पार पडला शपथविधी
अझहर शेख, नाशिक: ‘मैं शपथ लेता हूं की, भारत के संविधान के प्रति एवं भारतीय पुलिस के आदर्श के प्रति सच्ची श्रद्धा-निष्ठा रखूंगा...’ अशी शपथ नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये ३८९ पोलिस उपनिरिक्षकांनी (PSI) सामूहिकरित्या घेतली. १२६व्या सरळ सेवेच्या सत्रामधून तरुण-तडफदार उच्चशिक्षित अधिकाऱ्यांची तुकडी राज्य पोलिस दलाला मिळाली आहे.
महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये बुधवारी (दि.२४) सकाळी आठ वाजता सरळ सेवेतील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२६व्या सत्राचा दीक्षान्त सोहळा उगवत्या दिनकराच्या साक्षीने थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी प्रशिक्षणार्थींच्या मानवंदना स्वीकारली. मुख्य कवायत मैदानात पोलिस बॅन्ड पथकाच्या विशिष्ट धूनवर प्रशिक्षणार्थींच्या तुकडीने शानदार संचलन सादर केले. तुकडीचे परेड कमांडर म्हणून प्रियंका पाटील यांनी नेतृत्व केले. यावेळी अकादमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ देत अहवाल वाचन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपसंचालक संजय बारकुंड आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थींचे पालक, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
१२ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वी..!
आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राइम, गुन्हेगारी शास्त्र तसेच बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव, योगा आदींचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींनी घेतले. बारा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरित्या पूर्ण केले.
पुरस्काराचे मानकरी असे...
मानाची रिव्हॉल्वरसह सिल्वर बॅटन, डॉ. बी. आर. आंबेडकर ट्रॉफी, यशवंतराव चव्हाण गोल्ड ट्रॉफी, अहिल्यादेवी होळकर ट्रॉफी असे पाच पारितोषिक प्रियंका पाटील (कोल्हापूर) यांनी पटकाविले. द्वितीय उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी दीपक घोगरे (लातूर), बेस्ट कॅडेट रायफल शूटिंग : पवन गोसावी (मालेगाव,नाशिक) आणि बेस्ट कॅडेट इन ड्रील : वैभव डोंगरे या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करत पुरस्कार पटकाविले.