ST in bankruptcy Income bar | दिवाळीत एस.टी. उत्पन्नाचा फुसका बार
दिवाळीत एस.टी. उत्पन्नाचा फुसका बार

नाशिक : दिवाळीत बसेसला प्रवाशांची होणारी गर्दी आणि त्यामुळे उत्पन्न वाढीची संधी असल्याने महामंडळाने प्रवासी भाड्यात हंगामी वाढ करूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. गतवर्षीच्या तुलनेत एस.टी. महामंडळाचे उत्पन्न तब्बल ७३ लाखांनी कमी झाले आहे.
दिवाळी तसेच यात्रांच्या कालावधीत बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचा महामंडळाचा आजवरचा अनुभव आहे. या माध्यमातून महामंडळाला कमी-अधिक प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असते. त्यामुळे अशा सण, उत्सवाच्या काळात महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन केले जाते. दिवाळी हंगामात एस.टी. महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत कोट्यवधींची लक्ष्मी अवतरते. परंतु यंदा मोठा गाजावाजा करून महामंडळाने हंगामी भाडेवाढ करून यंदा किमान दोन लाखांनी उत्पन्न वाढेल, असा अंदाज दर्शविला होता. परंतु भाडेवाढ करूनही महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही.

दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागीय महामंडळाकडून यंदा दिवाळीच्या दहा दिवसांच्या हंगामासाठी ६० जादा गाड्यांचे नियोजन केले होते. यासाठी हंगामी भाडेवाढदेखील करण्यात आलेली होती. त्यामुळे नियमित भाड्यापेक्षा जादा भाडे महामंडळाला अपेक्षित होते. गाड्यांना गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात होती. गर्दीमुळे गाड्यांना विलंब होण्याचे प्रकारदेखील घडल्याने प्रवाशांचा प्रतिसाद लाभला असे चित्र निर्माण झाले होते, परंतु ही गर्दी केवळ भाऊबीजेच्या दिवशीच असल्याचे महांमडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र प्रत्यक्ष उत्पन्न कमी असल्याचे समोर आले आहे. दिवाळी हंगामात महामंडळाला २ कोटी २१ लाख ८७ हजार ९२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ७३ लाखांनी कमी ठरले आहे. मागीलवर्षी नाशिक एस.टी. महामंडळाला २ कोटी ९४ लाख १९ हजार १८२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. गत वर्षीच्या तुलनेत यंदा ७३ लाखांनी उत्पन्न घटल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील १३ डेपोंमधून नियमित बसेस व्यतिरिक्त जादा ६० बसेसचे नियोजन करण्यात आले होते. जुने सीबीएस, नवीन सीबीएस व महामार्ग बसस्थानकावरून या बसेस सोडण्यात आल्या होत्या. पुणे आणि धुळे मार्गावर सर्वाधिक बसेस सोडण्यात आल्या होत्या.
डेपोनिहाय उत्पन्न
नाशिक-१ ५२,४८,१०८
नाशिक-२ १७,९६,१५६
मालेगाव १८,१३,१८२
सटाणा २६,६५,७१५
सिन्नर १८,२५,१२०
नांदगाव ११,८१,९५५
इगतपुरी ७,६९,३०९
लासलगाव १३,०३,३०९
कळवण ३३,१५,८४७
पेठ ७,४३,७८९
येवला ५,४३,५६१
पिंपळगाव ९,८०,६७४

Web Title:  ST in bankruptcy Income bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.