नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 22:14 IST2025-08-28T22:13:30+5:302025-08-28T22:14:18+5:30

देवळाली कॅम्प हा परिसर लष्करी छावनीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात लष्कराशी संबंधित स्कूल ऑफ आर्टिलरी, वायुसेना स्टेशन आदी केंद्रे आहेत.

Soldier's hang glider crashes into a house near Deolali Camp in Nashik; Accident during training | नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

नाशिक आर्मी ॲडव्हेंचर विंगच्या एका जवानाकडून साहसी क्रीडाप्रकारांतर्गत येणाऱ्या हँग ग्लायडरद्वारे गुरुवारी (दि.२८) सकाळी नियमितपणे सराव केला जात होता. यावेळी अचानक काही तरी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने जवानाचे ग्लायडरवरील नियंत्रण सुटले अन् ते ग्लायडर थेट देवळाली कॅम्पजवळील शिंगवे बहुला गावातील लोकवस्तीमधील एका रहिवाशाच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ग्लायडिंग करणारे हवालदार गुरूदेव सिंग हे गंभीररित्या जखमी झाले असून त्याच्यावर देवळाली कॅम्पच्या सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देवळाली कॅम्प हा परिसर लष्करी छावनीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात लष्कराशी संबंधित स्कूल ऑफ आर्टिलरी, वायुसेना स्टेशन आदी केंद्रे आहेत. दरम्यान, या भागात लष्करी जवानांकडून वेगवेगळ्या प्रकारचा सैनिकी प्रशिक्षणांतर्गत सराव केला जात असतो. खंडोबा टेकडी डोंगराच्या पुढे देवळाली फिल्ड फायरिंग रेंजकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिंगवे बहुला हे टोकाला वसलेले शेवटचे गाव आहे. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास या भागात लष्कराच्या एका जवानाकडून साहसी क्रीडाप्रकारांतर्गत मोटार हँग ग्लायडरद्वारे सराव केला जात होता. यावेळी अचानकपणे त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि जवानाचे ग्लायडरवरील नियंत्रण सुटले. गावातील कौसाबाई चव्हाण या रहिवासी महिलेच्या घरावर हे ग्लायडर कोसळले. दुर्घटनेची माहिती वॉकीटॉकीद्वारे जवानाकडून मिळताच सैनिकांचे ‘विंड रायडर्स’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या पत्र्यावर चढून काही जवानांनी ग्लायडरमध्ये अडकलेल्या जवानाला ‘रेस्क्यू’ केले आणि तातडीने लष्कराच्या वाहनातून रुग्णालयात हलविले. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद लष्कराच्या संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नव्हती.

पॉवर्ड हार्नेस हँग ग्लायडिंगच्या सराव उड्डाणादरम्यान ग्लायडर अचानक खाली आल्यामुळे अपघात घडला. या अपघातात ग्लायडर उड्डाण करणारे हवालदार गुरूदेव यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना देवळाली येथील मिलिटरी रूग्णालयात प्रथमोपचारासाठी तत्काळ दाखल करण्यात आले. त्यांच्या पाठीच्या व हातपायांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले असून प्रकृती स्थिर आहे. त्यांनी पुढील उपचारासाठी भारतीय नौदलाच्या मुंबईस्थित आयएनएचएस अश्विनी रूग्णालयात हलविण्यात येणार आहे.- अंकुश चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, संरक्षण, पुणे

Web Title: Soldier's hang glider crashes into a house near Deolali Camp in Nashik; Accident during training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.