समाजकल्याणने शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा आग्रह सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 15:47 IST2018-03-15T15:47:27+5:302018-03-15T15:47:27+5:30
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गंत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नुतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना यापुर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या

समाजकल्याणने शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा आग्रह सोडला
नाशिक : गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा आग्रह धरल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकल्याण विभागाने त्यापासून बोध घेत यंदा विद्यार्थी व महाविद्यालयांना आॅफलाईन अर्ज सादर करण्याच्या सुचना दिल्या असून, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे पंधरा दिवस शिल्लक असल्याचे पाहून येत्या दोन दिवसात तातडीने अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गंत सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी नुतनीकरण अर्ज व सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन आॅफलाईन अर्ज भरण्याच्या सुचना यापुर्वीच समाजकल्याण विभागाने सर्व महाविद्यालयांना दिल्या होत्या, परंतु सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे बहुतांशाी महाविद्यालयांनी फक्त नुतनीकरणाचेच अर्ज दाखल केले आहेत. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन नुतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज काही महाविद्यालयांनी सादर केले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांनी १६ मार्च पुर्वी नवीन व नुतनीकरणाचे आॅफलाईन अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठवावेत असे आवाहन सहाय्यक समाजकल्याण आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. चालु आर्थिक वर्ष संपण्यास पंधरा दिवस शिल्लक आहेत. सन २०१७-१८ या शौक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजनेंतर्गंत लाभ अदा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती शासनाने जानेवारीत काढलेल्या आदेशात नमूद असून, त्यानुसार विजाभज, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य योजनांमधील शंभर टक्के निधी विद्यार्थ्यांना मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे सन २०१७-१८ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे नुतनीकरण अर्ज आॅनलाईन प्रणालीद्वारे त्या त्या महाविद्यालयांनी आॅनलाईन पद्धतीने आणि सन २०१७-१८ मधील नवीन आॅफलाईन अर्ज विहीत नमुन्यात अचूक माहितीसह सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार १६ मार्च पुर्वी महाविद्यालयांनी सदरचे अर्ज सादर करावेत त्यानंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत असेही वाजे यांनी म्हटले आहे.