SITकडून मिरगावातील ब्रह्मसदन बंगल्याची तपासणी; भोंदूबाबा खरात विरोधात आता वन विभागही सरसावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:14 IST2026-03-26T12:14:10+5:302026-03-26T12:14:10+5:30
तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या या बंगल्याभोवती पथकाने परिसराची छाननी करत विविध बाबींची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.

SITकडून मिरगावातील ब्रह्मसदन बंगल्याची तपासणी; भोंदूबाबा खरात विरोधात आता वन विभागही सरसावला
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील ‘ब्रह्मसदन’ या आलिशान बंगल्यावर विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी (दि.२४) रात्री उशिरा तपासणी केली. न्यायालयात खरातला हजर केल्यानंतर एसआयटी पथक थेट मीरगाव येथे दाखल होत ईशानेश्वर मंदिर परिसरातील या बंगल्याची तपासणी करण्यात आली.
तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या या बंगल्याभोवती पथकाने परिसराची छाननी करत विविध बाबींची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.
पुराव्यांबाबत गोपनीयता
या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पुढील काही दिवसांत अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी स्थानिक पोलिसांनी याच बंगल्यावर झडती घेतली असता एक रिव्हॉल्व्हर व काही काडतुसे जप्त केल्याची माहिती समोर आली होती.
त्यामुळे या बंगल्याचा या प्रकरणाशी असलेला संबंध अधिक गडद झाला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने केलेली तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नेमके काय आढळले, कोणते पुरावे हस्तगत करण्यात आले याबाबत गोपनीयता पाळली जात आहे.
भोंदूबाबा खरात विरोधात आता वन विभागही सरसावला
भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांचा ‘एसआयटी’कडून सखोल तपास केला जात आहे. दररोज खरातचे वेगवेगळे कारनामे उघड होत आहेत. सिन्नरच्या मिरगावात त्याने उभारलेल्या मंदिरात अघोरी प्रकारासाठी वन्य प्राण्यांची हत्या करून त्यांच्या अवयवांचा वापर केल्याचा सुद्धा संशय तपास पथकाला आहे. यामुळे आता त्या दिशेनेही तपास केला जात असून, नाशिक पश्चिम वन विभाग सुद्धा ‘एसआयटी’च्या संपर्कात आहे.
भोंदू अशोक खरात याने त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना हरणांची कस्तुरी देण्याचा प्रकार केल्याची चर्चा आहे. कस्तुरी त्याने कोठून व कशी मिळविली? याचा तपास करायचा असल्याचे सरकार पक्षाकडून न्यायालयात मंगळवारी सांगण्यात आले होते. तसेच हरणांची यासाठी शिकार केली गेली का? असाही संशय तपास पथकाला आहे. यामुळे आता भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार भोंदू खरातविरुद्ध कलमवाढ केली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू
सध्या भोंदू अशोक खरात याच्याविषयी पीडित महिलांच्या तक्रारी दाखल होत असून, त्याव्यतिरिक्त अनेकांनी आपल्याला धमक्या दिल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील खरातने हे प्रकरण उघड करू नये यासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी धमक्या दिल्या होत्या, असा दावा केला आहे.
खरातने या धंद्यात जम बसविला, तेव्हा २००७ मध्ये ‘अंनिस’कडे एक तक्रार आली होती. त्यानुसार ‘अंनिस’चे कार्यकर्ते महेंद्र दातरांगे व प्रा. डॉ. सुदेश घोडेराव हे खरातच्या कार्यालयात गेले होते. तो करत असलेले कृत्य हे अंधश्रद्धायुक्त असून चुकीचे आहे, अशी जाणीव कार्यकर्त्यांनी त्याला करून दिली. त्यावर मी निवृत्त कॅप्टन आहे. माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे, अशी धमकी त्याने कार्यकर्त्यांना दिली; पण कार्यकर्त्यांनी न घाबरता आव्हान दिले. त्यावर त्याने सावध राहा, अशी धमकी दिली होती. त्यावेळी भोंदू खरात त्याने त्याचे उपद्व्याप सुमारे तीन महिने बंद ठेवले होते. मात्र, काही दिवसांनी त्याने पुन्हा त्याचे कृत्य सुरू केल्याचे ‘अंनिस’ने म्हटले आहे.
२०१३ मध्ये अंनिसचे सिन्नर येथील कार्यकर्ते अरुण घोडेराव यांच्याशी ईशान्येश्वर मंदिराच्या एका ट्रस्टीने वाद घालून धमकी दिली होती. तुम्ही अंनिसवाले अनेक भोंदूबाबांच्या मागे लागता; पण आमच्या नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू, असे म्हणत धमकावले होते. यानंतरही ‘अंनिस’कडे पीडित संपर्क करत होते; पण धाडसाने पुढे येऊन पोलिसांत तक्रार देण्यास ते घाबरत होते, असे कार्यवाह चांदगुडे यांनी माध्यमांना सांगितले.
खरातप्रकरणी कुरघोडीचे राजकारण सुरूच
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून विविध राजकीय नेत्यांकडून टीकेची झोड उठत आहे. विरोधी नेते सरकारला या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार)च्या रूपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावरील टीकास्त्र अव्याहत सुरू ठेवले आहे.
डझनभर मंत्री तुरुंगात जाण्याची शक्यता
महाराष्ट्रात जे काही सध्या चालले ते हास्यास्पद आहे. काही मंत्र्यांनीही खरातकडे अघोरी पूजा केली आहे. या प्रकरणी डझनभर मंत्री, दोन डझन अधिकारी तुरुंगात जातील. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष,
काँग्रेस ३८ आमदारांनी कापल्या करंगळ्या, चौकशी करा
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला हाेता. ३८ आमदारांनी भोंदू अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. त्याची चौकशी करा आणि खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा.- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार)
भाजपच्याच नेत्याकडून ईशान्येश्वर मंदिराला निधी
सरकारने या संधीचा वापर करावा. खरातसंदर्भात जे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेले आहेत, ते तपासले पाहिजे. भाजपच्याच एका नेत्याने ईशानेश्वर संस्थानसाठी दीड कोटीचा निधी दिला. खरे काय ते समोर येऊ द्या.
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शरद पवार)
चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा
रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी (अजित पवार)च्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा. पक्षाच्या पुरोगामी चेहऱ्याला डाग लागला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विनंती आहे. - रूपाली ठोंबरे पाटील, नेत्या, राष्ट्रवादी (अजित पवार)
चाकणकरांच्या हकालपट्टीसाठी महिला आघाडी मैदानात
भोंदू अशोक खरात याच्या ट्रस्टवर पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. आता त्यांची राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादीच्या (अजित पवार) १३ तालुका अध्यक्षांनी केली आहे.
यासंदर्भात नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून निवेदन दिले आहे. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर अनेक वर्षांपासून महिलांचा छळ करणाऱ्या व्यक्तीचे त्या समर्थन करत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पक्षाच्या प्रतिमेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.