सिन्नरच्या अभिनव बालविकास मंदिराच्या प्रांगणात अवतरली पंढरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:05 IST2019-07-12T18:04:16+5:302019-07-12T18:05:13+5:30
सिन्नर : आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील विविध शाळा व विद्यालयात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणीसह वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. ज्ञानदेव-माऊली च्या जयघोषात शालेय परिसर भक्तिमय झाला होता.

सिन्नरच्या अभिनव बालविकास मंदिराच्या प्रांगणात अवतरली पंढरी
अभिनव बालविकास मंदिर टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा नामघोष अभिनव बालविकास मंदिराच्या प्रांगणात गुरूवारी ऐकायला मिळाला. निमित्त होते... आषाढी एकादशी निमित्त आयोजित वृक्षदिंडीचे आणि पालखी पूजन सोहळ्याचे. हातात भगवी पताका घेतलेले वारकरी, डोई तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आणि टाळ-मृदंगाचा घुमलेला गजर असा माहोल येथे बघायला मिळाला. विठ्ठल-रखुमाईच्या वेशातील चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख पाहुणे तेजस्विनी वाजे, नगरसेवक सुजाता भगत, सुजाता तेलंग, शालेय समिती सदस्य पंढरीनाथ शेळके, मुख्याध्यापक संगीता आव्हाड या मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडीचे स्वागत आणि पालखी पूजन करण्यात आले. उपशिक्षक नीतेश दातीर यांनी गायलेल्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गाण्यावर चिमुकल्यांनी ठेका धरला. उपशिक्षिका सरला वर्पे, वृषाली खताळ यांनी चिमुकल्यांना आषाढी एकादशीचे महत्व, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी माहिती दिली. रिंगण सोहळ्यात चिमुकल्या वारकऱ्यांनी विविध खेळ खेळून धमाल उडविली. शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.