नगराध्यक्ष क्रिकेट स्पर्धेत सिन्नर चॅलेंजर्सची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:50 IST2021-01-29T21:00:35+5:302021-01-30T00:50:12+5:30
सिन्नर : येथील नगरपरिषदेच्यावतीने कै. कमलाकर ओतारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक २०२१ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सिन्नर चॅलेंजर्सने अंतिम सामन्यात सिन्नर सुपरकिंग्जचा पराभव करीत नगराध्यक्ष चषकावर मोहर उमटविली. स्पर्धेत ५ संघ सहभागी झाले होते.

नगराध्यक्ष क्रिकेट स्पर्धेत सिन्नर चॅलेंजर्सची बाजी
या स्पर्धेचा गतविजेता संघ सिन्नर कॅपिटलला उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला व सिन्नर चॅलेंजर्सने बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरा उपांत्य सामना सिन्नर रॉयल्स विरूध्द सिन्नर सुपरकिंग्ज यांच्यात झाला. यामध्ये सिन्नर सुपरकिंग्जने बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात सिन्नर चॅलेंजर्सने ८ षटकात ७५ धावांचे लक्ष्य दिले. सुपरकिंग्जची फलंदाजी ढासाळली. ८ फलंदाज गमावताना त्यांना केवळ ४९ धावा करता आल्या. सिन्नर चॅलेंजर्सने नगराध्यक्ष चषकावर नाव कोरले. सुरज सोनकुसरे याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, तर उत्तम खैरे यास सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या दोन्ही संघास नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, गटनेते हेमंत नाना वाजे, मुख्याधिकारी संजय केदार यांचे हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सर्व सामन्याचे पंच म्हणून सचिन भुजबळ व सिद्धार्थ नक्का यांनी काम केले. शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी नियोजन व व्यवस्थापन केले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.