शिवसेनेची ‘प्लंबर तुमच्या घरी’ मोहीम
By Admin | Updated: January 21, 2016 23:33 IST2016-01-21T23:32:20+5:302016-01-21T23:33:07+5:30
पाणी गळती थांबविणार : शिवसैनिक करणार बचतीचा जागर

शिवसेनेची ‘प्लंबर तुमच्या घरी’ मोहीम
नाशिक : एकीकडे पाणीकपातीवरून राजकारण सुरू असतानाच शिवसेनेने भविष्यातील संकटाची स्थिती ओळखत सामाजिक दायित्व म्हणून पाणी गळती थांबविण्यासाठी ‘प्लंबर तुमच्या घरी’ ही मोहीम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहाही विभागांकरिता कुशल प्लंबर्सचे पथकच तयार करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.
शहरात पाणीकपात करायची की नाही, यावरून महापालिकेतील सत्ताधारी गट विरुद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. परंतु, पाणीबचतीसाठी शिवसेनेने घरोघरी जाऊन गळती थांबविण्याचा आणि नागरिकांना पाणी बचतीसाठी आवाहन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्या-त्या विभागातील उपमहानगरप्रमुख व विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्लंबर्सचे पथक जाऊन तेथील वस्त्यांमधील स्टॅण्डपोस्ट, सोसायट्यांमधील नळजोडणी, रस्त्यांवरील पाइपलाइन यामधील गळती शोधून ती थांबविण्याचा प्रयत्न करणार आहे. सदर प्लंबिंग दुरुस्ती ही मोफत करून दिली जाणार आहे. याचवेळी घरोघरी शिवसैनिक जाऊन पाणीबचतीचा जागर करणार आहेत. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत २३ जानेवारीला महिलांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात येणार आहे. शहरात चेनस्नॅचिंग, छेडछाड, मोबाइल चोरी आदि घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. पोलीस ठाण्यात तक्रारीही नोंदवून घेण्यात टाळाटाळ होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यालयात सकाळी १० ते ५ या वेळेत हेल्पलाइन सेवा कार्यरत करण्यात येणार असून, घरगुती वाद वगळता महिलांच्या अन्य तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी सेनेचा लिगल सेल कार्यरत राहणार असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)