शिवडीच्या यश वाबळेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:36 IST2019-12-21T00:36:16+5:302019-12-21T00:36:38+5:30
रेल्वे लाइनलगत सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, पंचवीस हजारांची रोकड आणि महागडा मोबाइल असा तब्बल एक लाखाचा ऐवज संबंधिताना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे निफाड येथील वैनतेय विद्यालयात शिकणाऱ्या शिवडी येथील यश दत्तू वाबळे (१२) विद्यार्थ्याने या चिमुकल्याच्या प्रामाणिकपणाचे निफाड तालुक्यात कौतुक होत आहे.

शिवडीच्या यश वाबळेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
लासलगाव : रेल्वे लाइनलगत सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, पंचवीस हजारांची रोकड आणि महागडा मोबाइल असा तब्बल एक लाखाचा ऐवज संबंधिताना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे निफाड येथील वैनतेय विद्यालयात शिकणाऱ्या शिवडी येथील यश दत्तू वाबळे (१२) विद्यार्थ्याने या चिमुकल्याच्या प्रामाणिकपणाचे निफाड तालुक्यात कौतुक होत आहे.
जळगाव येथील आपल्या नातेवाइकाकडे गेलेले ज्ञानेश्वर व ज्योती पाटील हे दांपत्य बुधवारी (दि. १८) भुसावळ-मुंबई पॅसेंजरने परतत होते. रेल्वेप्रवासात ज्योती यांची पर्स डब्यातून पडली. ही बाब कल्याणजवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आली. दरम्यान शिवडी येथील स्टेशनजवळ वाबळे वस्तीवर राहणारा यश वाबळे हा विद्यालयातून घरी आला. इतर मुलांसह खेळण्यासाठी प्लॅटफार्मकडे गेला. त्यावेळी रेल्वे लाइनलगत पडलेली पर्स त्याला सापडली. सदर पर्स कुटुंबीयांना दाखविली. त्याच वेळी ज्योती पाटील यांनी त्यांच्या मोबाइलवर केलेला फोन खणाणला. दत्तू वाबळे यांनी फोन उचलला. काळजीच्या सुरात पलीकडून त्यांना पर्स, मोबाइल, पैसे, दागदागिने याबाबत विचारणा करण्यात आली. दत्तू वाबळे यांनी त्यांना सर्व ठीक आहे व ते तुम्हाला परत करू, असे सांगितले. दुसºया दिवशी दुपारी पाटील परिवार शिवडी येथील वाबळे वस्तीवर आले. रेल्वे प्रवासाचे तिकीट तसेच ओळख पटविल्यानंतर वाबळे परिवाराने त्यांना मुद्देमालासह पर्स परत केली.
बक्षिसही नाकारले
यश वाबळेला देऊ केलेले बक्षिसरूपी पैसेदेखील वाबळे परिवाराने घेतले नाही. ईमानदारीची किंमत करू नका, आपण सुखी आहोत असे सांगत पाटील परिवाराचे आदरातिथ्य करून वाबळे परिवाराने नवे ऋ णानुबंध निर्माण केले.