'Shiv Sena' strategy to prevent Chhagan Bhujbal; Who will get the nomination? | छगन भुजबळांना रोखण्यासाठी शिवसेनेची 'रणनीती'; कुणाला मिळणार उमेदवारीचा कौल?
छगन भुजबळांना रोखण्यासाठी शिवसेनेची 'रणनीती'; कुणाला मिळणार उमेदवारीचा कौल?

- धनंजय वाखारे

नाशिक : गेल्या तीन निवडणुकांपासून राज्यात चर्चेत राहणारा येवला मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीने घुसळून निघाला आहे. मात्र, यंदा भुजबळांना रोखण्यासाठी शिवसेनेनेही गांभीर्याने घेतले असून, मतदारसंघ पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी भुजबळांसमोर लढत देणारे माजी आमदार कल्याणराव पाटील, संभाजी पवार आणि राष्ट्रवादीतूनच आव्हान देणारे अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकण्यासाठी तयारी सुरु केली असली तरी मातोश्रीवरून मात्र उमेदवारीसाठी कोणाला कौल दिला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघ हा १९६२च्या निवडणुकांपासून संमिश्र कौल देत आला आहे. कधी काँग्रेसच्या तर कधी अपक्ष आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या पारड्यात मतांचे दान टाकणाऱ्या या मतदारसंघाने परिवर्तन घडवले आहे. मात्र, २००४ नंतर सलग तीन वेळा या मतदारसंघाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पसंती देत बदलाचे वारे रोखून धरले. १९९५ आणि १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात होता. १९९५ मध्ये शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत विधानसभेत पाऊल ठेवले होते. कल्याणराव पाटील यांनी त्यावेळी ३४.६८ टक्के मते घेतली होती. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही कल्याणराव पाटील यांनी पुन्हा उमेदवारी करताना ५२ हजार १४४ मते घेत शिवसेनेकडेच जागा राखली होती.

२००४च्या निवडणुकीत मात्र येवल्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली आणि त्यांनी शिवसेनेचे कल्याणराव पाटील यांचा पराभव करत येवल्याचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले. त्यावेळी भुजबळ यांना ७९ हजार ३०६, तर कल्याणराव पाटील यांना ४३ हजार ६५७ मते मिळाली होती. त्यावेळी आघाडी सरकारमध्ये जबाबदार पदांवर असलेल्या भुजबळ यांनी २००९ मध्येही पुन्हा येवल्यातून उमेदवारी करत १ लाख ६ हजार ४१६ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी ६३.१४ टक्के इतकी भरीव होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना ५६ हजार २३६ मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ३३.३७ टक्के इतकी होती. या निवडणुकीत शिवसेनेने भुजबळांना रोखण्यासाठी कल्याणराव पाटील यांच्याऐवजी माणिकराव शिंदे यांची निवड करत उमेदवार बदलला होता. परंतु, भुजबळ पुन्हा एकदा जागा राखण्यात यशस्वी ठरले होते.२०१४च्या निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट असतानाही येवल्यातून छगन भुजबळ यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी करत विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीतही भुजबळांना रोखण्यासाठी शिवसेनेने पुन्हा उमेदवार बदलला आणि संभाजी पवार यांच्या रूपाने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदी लाट असतानाही भुजबळांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यावेळी भुजबळ यांनी १ लाख १२ हजार ७८७ मते घेतली होती, तर संभाजी पवार यांनी ६६ हजार ३४५ मते घेत लढत दिली होती. भुजबळांना तब्बल ५८.१९ टक्के मते मिळालेली होती.

आता २०१९ च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा येवल्यातूनच उमेदवारी करण्याचे संकेत दिले आहेत आणि त्यादृष्टीने तयारीही आरंभली आहे. मात्र, यंदा राजकीय समीकरणे भुजबळांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचा धुराळा अद्यापही बसलेला नाही. भुजबळ यांनी याबाबत आपण राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी रोज घडणा-या घडामोडींमुळे भुजबळ चर्चेत राहिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती अद्यापही कायम आहे. त्यातच स्वपक्षातूनच भुजबळांना माणिकराव शिंदे यांनी आव्हान उभे केले आहे तर गेल्यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी करणारे संभाजी पवार पुन्हा एकदा बाशिंग बांधून तयार आहेत. दीड वर्षापूर्वी भाजपत गेलेले माजी आमदार कल्याणराव पाटील हे सुद्धा स्वगृही परतल्याने शिवसेनेकडून त्यांचीही दावेदारी सांगितली जात आहे.

यापूर्वी भुजबळांविरुद्ध लढलेले कल्याणराव पाटील, माणिकराव शिंदे आणि संभाजी पवार या तिघांच्याही पदरी अपयशच पडल्याने शिवसेनेकडून यंदा नवा चेहरा दिला जाण्याची चर्चा जोर धरून आहे. परंतु, कोणाला उमेदवारी मिळणार आणि मातोश्रीच्या मनात काय शिजते आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने शिवसैनिकांमध्येही संभ्रमाची स्थिती कायम आहे. शिवसेनेकडून नवीन डावपेच खेळले जाण्याच्या शक्यतेनेचे भुजबळांकडून सावध पावले टाकली जात असल्याचे बोलले जात असून, प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतरच येवल्यातील गुपित उलगडणार आहे.

Web Title: 'Shiv Sena' strategy to prevent Chhagan Bhujbal; Who will get the nomination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.