“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 21:12 IST2025-09-14T21:10:38+5:302025-09-14T21:12:44+5:30
Sharad Pawar: ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. शेजारचे देश आपल्यासोबत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
Sharad Pawar: आपला पक्ष गांधी-नेहरु विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच रात्री लगेच चीनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये होते. यावेळी उपस्थितांना शरद पवार यांनी संबोधित केले. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीला भाव नाही. कांदा निर्यातीवर बंधने आहेत. एवढा मोठा जिल्हा असताना या शेतकऱ्यांची नाशिक जिल्हा बँक आजारी आहे. प्रचंड थकबाकी झाली आहे. केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित
पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहे. बांगलादेश उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने प्रयत्न केले होते. तो आपल्यासोबत नाही, श्रीलंका आपल्यासोबत नाही. देशाची धुरा पंतप्रधान मोदींच्या हातात आहे. त्यांनी आता परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिकच एक वैशिष्ट म्हणजे उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. शेतीवर नाशिककरांचे लक्ष आहे. आधुनिक शेतीचा विचार करणारा हा शेतकरी आहे. नवनवीन प्रयोग इथ पाहायला मिळतात. कांद्याचे, सोयाबीनचे उत्पन्न करणारा जिल्हा म्हणजे नाशिक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्याला जोडधंदा हा दुधाचा आहे. शेतीतील गोष्टी आपण अमेरिकेकडून घ्यायला लागलो तर शेती अडचणीत येईल. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर अवघड आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.