नाशिकमध्ये शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:36 IST2025-01-24T17:36:10+5:302025-01-24T17:36:33+5:30
काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे चांगले बस्तान बसवले असले तरी ते विधानसभा पातळीवर.

नाशिकमध्ये शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान
NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर सत्ता तेथे आमदार आणि काही पदाधिकारी अशी स्थिती असल्याने शरद पवार अवस्था गटाची बिकट झाली. विशेष म्हणजे अजित पवार गटाची राज्यात सत्ता आली आणि नाशिक जिल्ह्यातून सात आमदारही निवडून आल्याने आता खरी शरद पवार गटाची कसोटी आहे. महापालिका निवडणुका हा पक्ष कसा लढणार याविषयी साऱ्यांना उत्सुकता आहे. काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे चांगले बस्तान बसवले असले तरी ते विधानसभा पातळीवर. नाशिक शहरात पहिल्यापासून हा पक्ष कमकुवतच होता. विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना झाल्यानंतर अजूनपर्यंत नाशिक शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकदाही आमदारकीची संधी मिळालेली नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले होते त्यातील एकजण आता शिंदे सेनेच्या गळाला लागला असल्याने पाचजण अधिकृतरीत्या शिल्लक असले तरी महापालिका निवडणुका जाहीर होईपर्यंत यातील कितीजण शिल्लक राहणार हे सांगता येणार नाही.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात आमदार आणि काही माजी नगरसेवक गेले असले तरी गजानन शेलार, गोकुळ पिंगळे हे माजी नगरसेवक कायम आहेत. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाला बळ दिले आहे. विधानसभा निवडणुकीत या पक्षाकडून नाशिक शहरातील चारपैकी किमान तीन जागा लढविण्याची तयारी होती, मात्र, या पक्षाला एकच नाशिक पूर्तची जागा मिळाली आणि तीही पराभूत झाली. नाशिक मध्ये आमदार नसले तरी असलेल्या कार्यकर्त्याचे हौसले बुलंद आहे. त्यातच अनेक आयारामांवर महापालिका निवडणुकीची मदार आहे.
महाविकास आघाडी लढल्यास फायदा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सध्याची अवस्था फार चांगली नसली तरी पक्षात गटबाजी नाही असे नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच वाद झाले होते. शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमधील हे वाद चांगलेच गाजले होते. आता या निवडणुकीत सर्व नेतृत्व शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्याकडे असणार आहे, त्यामुळे त्यांचा कस लागणार आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती बघता नाशिक शहरात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तसे झाल्यास महायुतीला आव्हान देता येऊ शकेल. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता अत्यल्पच आहे. मात्र, तरीही सत्तारूढ पक्षातील घटक पक्षांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीला एकसंघ राहावे लागणार आहे.