विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; प्राथमिक शिक्षकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:46 IST2019-11-08T18:45:48+5:302019-11-08T18:46:07+5:30
कुरुंगवाडीतील घटना : जिल्हा परिषदेकडून गंभीर दखल

विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; प्राथमिक शिक्षकावर गुन्हा दाखल
घोटी : इगतपुरी तालुक्यातील कुरु ंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलींवर वारंवार अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील कुरु ंगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत रोहिदास मदन चव्हाण (रा. साईसृष्टी अपार्टमेंट, जाधव संकुल जवळ, पळसे, ता. जि. नाशिक) हा प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ह्या शाळेतील १३ ते १४ वर्ष वयाच्या पाच अल्पवयीन विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यापूर्वी रोहिदास चव्हाण वर्गात आल्यावर खिडक्यांचे पडदे व दरवाजा लावून घेत असे. मुलींच्या बाकांवर बसून त्यांच्याशी लैगिंक चाळे करीत असे. सदर मुलींनी कोणाला काही सांगू नये यासाठी त्याने धमकावल्याचेही प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेकडे माहिती पाठविली होती. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिका-यांनी इगतपुरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांना गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला. त्यानुसार घोटी पोलिसांनी लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२ चे कलम ८.१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, शीतल गायकवाड याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.