माजी विद्यार्थ्यांची ३६ वर्षांनी भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:49 IST2021-02-01T21:02:35+5:302021-02-02T00:49:44+5:30
इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलमधील सन १९८४ बॅचेसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची भावली धरणाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. यावेळी जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांची ३६ वर्षांनी भरली शाळा
इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलमधील सन १९८४ बॅचेसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची भावली धरणाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. यावेळी जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला.
कोरोना महामारीच्या संकटकाळात आपला निरंतर कौटुंबिक प्रवास करताना जिवाभावाचे सवंगडी एकमेकापासून दुरावले. पुन्हा काही कारणास्तव शालेय मित्र एकत्र आले तर उपेक्षितांना मदतीचा हात मिळेल, या संकल्पनेतुन सर्व जुन्या शालेय मित्रांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा शाळा भरविण्यात आली. विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेऊन २५ ते ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी संपर्कात आले. त्यानंतर भावली धरणाजवळील निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबासह स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. आपल्या कुटुंबासमवेत एक दिवस मैत्रीचा कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमात एकमेकाचे सुखदु:ख जाणून घेत दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थी व त्यांच्या परिवाराने मनमुराद आनंद लुटला. यावेळी अजित पारख, जीवन शहा, अविनाश थोरे, श्रीकांत गायकवाड, गणेश जाधव, संतोष मुथा, राजू चांडक, दीपक कदम, गुरुदत्त भाटी, नरेंद्र छाजेड, रामदास तांदळे, प्रशांत गुजराथी, काशिनाथ चव्हाण, कैलास गुजराथी, दिनेश पटेल आदी विद्यार्थी आपल्या परिवारासोबत उपस्थित होते.
यावेळी प्रत्येकाने एक वृक्ष रोपटे लावून वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.