ग्रामीण शहरी असमतोलाने चीन, पाकिस्तानची गरजच नाही : पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:43 IST2018-06-23T00:43:36+5:302018-06-23T00:43:57+5:30
जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे.

ग्रामीण शहरी असमतोलाने चीन, पाकिस्तानची गरजच नाही : पोपटराव पवार
नाशिक : जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या मनात शहरी नागरिकांविरोधी व शहरी नागरिकांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांविरोधात असंतोष निर्माण होत असून, ही असमतोलाची स्थिती लवकरात लवकर सावरली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांची गरज उरणार नाही असे परखड मत आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे. रावसाहेब थोरातसभागृहात नाशिक रोटरी क्लबतर्फे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय क ार्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा चेअरमन विलास शिंदे यांचा शुक्रवारी (दि. २२) नाशिक भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री विनायकदादा पाटील, दिलीपसिंह बेनीवाल आदी उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले, देशाच्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, सामाजिक सद््भावना यांसारखे विविध प्रश्न आजही कायम आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील उत्पन्नाचे स्रोत संपले असून, शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भाग विभागले गेले असून, शेती व शेतकºयांच्या प्रश्नांवर तोडगा काढून ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था समतोलात वाढली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूंची गरजच उरणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला, तर वनाधिपती विनायकदादा पाटील, विलास शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा शेती क्षेत्राचाच सन्मान असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीनंदन भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले, तर मनीष चिंधडे यांनी आभार मानले.