शहरात लॉकडाऊन लागू करण्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:46 IST2020-07-14T17:41:34+5:302020-07-14T17:46:53+5:30
शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात लॉकडाऊन लागू करण्याची अफवा
नाशिक : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत संपूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव नसून केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. काही शहरांनी दहा, तर काही शहरांनी पंधरा दिवसांसाठीचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशाच प्रकारे नाशिकमध्येदेखील लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आणि लॉकडाऊन करण्यासंदर्भातील अफवा वेगाने पसरत आहे.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचेदेखील प्रमाण वाढले आहे. कन्टन्मेंट झोनदेखील कमी झाले आहेत. रुग्ण आढळणा-या भागात तत्काळ उपाययोजनादेखील केल्या जात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४ हजार ७८९ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर २ हजार १४० जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सायंकाळी ७ नंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली आहे. महापालिका बाजारपेठेत सम-विषम तारखांना दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. नागरिकांना गर्दी कमी करण्याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे.
शहरातील परिस्थितीबाबत काही प्रमाणात नागरिकांमध्येदेखील भीती आहे. बाजारपेठेतील गर्दी कमी होताना दिसत नाही तर सुरक्षिततेच्या नियमांचे गांभीर्य राखले जात नसल्यानेदेखील चिंता वाढलेली आहे. प्रशासनापुढे कोरोना नियंत्रणासाठीचा मोठा प्रश्न असून त्यादृष्टीने सर्व नियोजन केले जात आहे. या सा-या परिस्थितीमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबतची अफवा पसरत आहे. वास्तविक जिल्हा अथवा मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन संदर्भातील कोणतीही चर्चा नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.