रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:43 IST2022-01-10T21:41:53+5:302022-01-10T21:43:02+5:30
लोककवी दिवंगत विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते.

रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला
नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मन मोठे करून शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन सत्तेत सहभागी व्हावे व पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
लोककवी दिवंगत विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत राहणार असून, उत्तर प्रदेशात बसपाचा जनाधार कमी झाला आहे. तेथे रिपाइंला संधी असल्यामुळे आम्ही काही जागांवर निवडणूक लढविणार आहोत. भाजपने रिपाइंला ८ ते १० जागा द्याव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही आठवलेंनी म्हटले.
भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन 5 वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री द्यावा. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबत भाजपला विनंती करणार आहे. भाजप शिवसेना एकत्र येईल असा प्रस्ताव मांडणार असल्याचे आठवले यांनी यापूर्वीही पुण्यात बोलताना म्हटले होते. त्यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले. त्याबरोबरच राज्यपाल, महाविकास आघाडी, अशा विविध मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली होती.
'गो महाविकास आघाडी गो'
'गो कोरोना गो' ही घोषणा जगभर गाजली. आता ओमायक्रॉन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा 'गो महाविकास आघाडी गो' असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये तरतूद करावी असंही आठवलेंनी म्हटलं होतं.