एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने लाखाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:08 IST2018-04-06T01:08:46+5:302018-04-06T01:08:46+5:30
नाशिक : एटीएमच्या केंद्रात मदतीच्या बहाण्याने भामट्याने सव्वा लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना पंचवटी परिसरातील गणेशवाडी भागात घडली आहे.

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने लाखाची लूट
नाशिक : एटीएमच्या केंद्रात मदतीच्या बहाण्याने भामट्याने सव्वा लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना पंचवटी परिसरातील गणेशवाडी भागात घडली आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युवराज दामू गायकवाड (रा.जेलरोड) मंगळवारी (दि.३) दुपारी गणेशवाडी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी अज्ञात इसमाने त्यांची मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत एटीएम कार्डची अदलाबदल करून घेतली. त्यानंतर तेथून पोबारा करत त्याने गायकवाड यांच्या खात्यातून वेगवेगळ्या एटीएम केंद्रात जाऊन सुमारे एक लाख २५ हजार ३४० रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. भामट्याने गायकवाड यांच्या हातात दिलेले एटीएम कार्ड इंदुमती धोंगडे नामक महिलेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस विविध ठिकाणच्या एटीएम बुथमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाचा आधार घेत चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. एटीएम केंद्रात मदतीचा बहाणा करणाºयांपासून बॅँकेच्या ग्राहकांनी सावध रहावे, कुठल्याही प्रकारे अनोळखी व्यक्तींच्या हातात एटीएम कार्ड सोपवू नये व त्यांना गोपनीय क्रमांकाची माहिती देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.