मालेगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला शहरातील यंत्रमागांचा खडखडाट पुन्हा एकदा सुरू होणार असून, रमजान आणि कोरोनामुळे घरात बसून असल्याने यंत्रमाग कामगारांची होत असलेली उपासमार त्यांच्या हाताला काम मिळाल्याने दूर होणार आहे. महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.आयुक्त कासार म्हणाले, राज्यात १२ लाख यंत्रमाग असून त्यातील तीन लाख यंत्रमाग एकट्या मालेगाव शहरात आहेत. शहरातील अनेक व्यवसाय याच व्यवसायावर अवलंबून आहेत. शासनाने रेड झोन असूनही मालेगावी यंत्रमाग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असून उपासमार सोसणाऱ्या मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यंत्रमाग कारखानदारांची बैठक घेऊन यंत्रमाग सुरू करण्याबाबत चाचपणी केली. महापालिकेने अधिसूचना काढल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. शहरातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.यंत्रमाग सुरू करताना फिजिकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर वापरणे. त्याचप्रमाणे मजुरांची वैद्यकीय तपासणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनीही यंत्रमाग कामगारांच्या अडचणी मांडल्या.---------------------------व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळशहरातील यंत्रमाग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउनमुळे तब्बल ६३ दिवसांपासून बंद असलेले यंत्रमाग सुरू होणार आहेत. मालेगाव कोरोनामुळे राज्यातील हॉट स्पॉट म्हणून पुढे आले आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळून आले तर मृतांची संख्याही मोठी असल्याने तसेच रेड झोनमुळे येथील यंत्रमाग व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे यंत्रमाग कामगारांची उपासमार झाली.-------------------------------१ जूनपासून शहरातील यंत्रमाग उद्योग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे, परंतु लॉकडाउनपूर्वी विक्री केलेल्या कापडाची वसुली मिळालेली नाही. कापड विक्री झाल्यानंतरच पेमेंट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिल्लक रक्कम दोन महिन्यांत खर्ची संपल्याने भांडवलअभावी सूत खरेदी व कामगारांना वेतन अदा करण्यासाठी रक्कम नसल्याने कारखाना सुरू कसा करणार हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.- आसिफ शेख, यंत्रमाग मालक
मालेगावी पुन्हा सुरू होणार यंत्रमागांचा खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:02 IST