महसूल खात्याचे आंदोलन सुरूच

By Admin | Updated: January 8, 2017 01:03 IST2017-01-08T01:03:14+5:302017-01-08T01:03:26+5:30

नांदगाव प्रकरण : सोमवारी ठरणार पुढील दिशा

The Revenue Department movement continued | महसूल खात्याचे आंदोलन सुरूच

महसूल खात्याचे आंदोलन सुरूच

नांदगाव : शर्तीच्या जमीन व्यवहारप्रकरणी प्रांत, तहसीलदारासह तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांविरुद्ध चुकीचे गुन्हे दाखल केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विरोधातील आपले आंदोलन कायम ठेवून काळ्या फिती लावल्या. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून जिल्ह्णातील सर्वच जमिनींचे व्यवहार तपासून पाहण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे आता महसूल दप्तरात जमिनींसंदर्भात निर्णयाविना पडून असलेल्या सर्वच फायली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे निर्णयासाठी पाठवून देण्याच्या निर्णयाप्रत महसूल यंत्रणा आली असून, त्यासंदर्भात सोमवारी पुढील भूमिका ठरणार आहे.
शर्तींच्या जमीन व्यवहाराला आपल्या अखत्यारित मंजुरी देणाऱ्या तहसीलदार सुदाम महाजन यांना महसूल खात्याने निलंबित करून सर्व जमिनी सरकार जमा केलेल्या असताना व त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही अर्धन्यायिक बाब म्हणून विभागीय आयुक्त तसेच उच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्याचा विचार न करता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने थेट गुन्हे दाखल केल्याची बाब महसूल यंत्रणेच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर कामकाज बंद ठेवून त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विरोधातच कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. शनिवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. त्यासाठी सकाळी सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांची बैठक होऊन सदरचे गुन्हे मागे घेतल्याशिवाय लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महसूल खात्याकडे जमीन विषयक बाबी असून, यासंदर्भातील सर्व प्रकरणे आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे निर्णयासाठी वर्ग करून त्यांच्या मार्फतच प्रकरणे हाताळण्याचा निर्णय व्हावा यासाठी फाईली त्यांच्या ताब्यात देण्याची तयारी महसूल खात्याने चालविली आहे. सोमवारी यासंदर्भात विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: The Revenue Department movement continued