विवाहित महिलेसोबत संबंध, तरुणाचं अपहण करून निर्घृण हत्या; २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:17 IST2025-03-19T18:16:55+5:302025-03-19T18:17:11+5:30

गळा आवळून तरुणाला ठार मारल्याची कबुली चारही आरोपींनी दिल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली.

Relationship with a married woman kidnapping and brutal murder of a young man Mystery of the death of a 21 year old young man solved | विवाहित महिलेसोबत संबंध, तरुणाचं अपहण करून निर्घृण हत्या; २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले!

विवाहित महिलेसोबत संबंध, तरुणाचं अपहण करून निर्घृण हत्या; २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले!

Nashik Murder Case: महिलेसोबत अनैतिक संबंधाचा संशय घेत वज्रेश्वरीन झोपडपट्टीत राहणाऱ्या श्रीकांत भीमराव उबाळे या २१ वर्षीय युवकाचे अपहरण करत पेठजवळच्या सावळघाटात घेऊन जात संशयितांनी गळा आवळून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी त्याचा मृतदेह म्हसरूळ पोलिसांना दुपारी आढळून आल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत श्रीकांतचे चौघांनी मिळून रिक्षातून अपहरण केले होते. त्याला पेठजवळच्या करंजाळीच्या सावळघाटात घेऊन जात बेदम मारहाण करत गळा आवळून ठार मारत मृतदेह झाडीझुडपात फेकून दिला होता. त्याचा मृतदेह हा सोमवारी म्हसरूळ पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता सायंकाळपर्यंत सापडला नव्हता. यामुळे मंगळवारी सकाळी पुन्हा म्हसरूळ पोलिस, नाशिक पोलिसांच्या श्वान पथकातील गुगल वानसह घटनास्थळी दाखल झाले. तेथे गुगल श्वानला रुमाल हुंगविण्यात आला असता त्याने माग काढत मृतदेहाचा शोध घेण्यास पोलिसांनी मदत केली. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली असता तो श्रीकांतचा असल्याचे स्पष्ट झाले. तातडीने पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या चौघांविरुद्ध आता खुनाचेही कलम वाढविण्यात आला आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून रवाना होत संशयितांना ताब्यात घेतले होते. यामध्ये संशयित दीपक कुंडलिक काकडे (२६), सविता चंद्रकांत काकडे (४६, दोघे रा. कलानगर), चंद्रकांत नारायण कुलकर्णी (५२, रा. पोकार कॉलनी), राहुल अशोक शेळके (रा. गौरी पटांगण गंगाघाट) यांचा समावेश आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संशयित आरोपी दीपक काकडे याच्या पत्नीसोबत श्रीकांत याचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो प्रेयसीला भेटण्यासाठी पोकार कॉलनीजवळ गेला असता ही बाब दीपक यास माहिती झाल्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. तेथे संशयितांनी मिळून पोकार कॉलनी परिसरात त्याला बेदम मारहाण केली. तसेच तेथून रिक्षामध्ये बळजबरीने बसवून करंजाळीजवळ सावळघाटात घेऊन जात गळा आवळून ठार मारल्याची कबुली चारही आरोपींनी दिल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली.

केटरिंगची कामे करून उदरनिर्वाह
मूळ परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेला श्रीकांत हा गंगाघाट परिसरातील समाधान गायकवाड नामक व्यक्तीकडे केटरिंगचे काम करत होता. गेल्या आठवड्यात श्रीकांत हा अचानकपणे बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार त्याच्या वडिलांनी म्हसरूळ पोलिसांत दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला.
 

Web Title: Relationship with a married woman kidnapping and brutal murder of a young man Mystery of the death of a 21 year old young man solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.