स्क्रीझोफ्रेनिया दिन विशेष : स्क्रीझोफ्रेनियाग्रस्तांच्या प्रमाणात वेगाने वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:52 IST2020-05-24T13:46:53+5:302020-05-24T13:52:03+5:30
आपल्याबाबत सतत कोणीतरी कुभांड रचत आहे , अन्य माणसे सतत आपल्याबाबतच काही ना काही कुजबुजत आहेत, चित्रविचित्र आवाज सातत्याने येणे, ते भास नसून खरेच आवाज असल्याची खात्री वाटणे, सतत नैराश्यग्रस्त आणि चिडचिडेपणा येणे यासह अनेक लक्षणे आजाराने ग्रस्त नागरिकांमध्ये दिसू लागतात.

स्क्रीझोफ्रेनिया दिन विशेष : स्क्रीझोफ्रेनियाग्रस्तांच्या प्रमाणात वेगाने वाढ !
नाशिक : जनुकीय कारणांबरोबरच भावनिक, बौद्धिक गुंता आणि ताण-तणावांचा भार असह्य झाल्याने होणारा स्क्रीझोफ्रेनिया हा मानसिक आजार दशकागणिक वाढत चालला आहे. गत शतकात हजार नागरिकांमागे एक रुग्ण असलेले प्रमाण दोन दशकात वाढून हजार नागरिकांमागे पाच रुग्ण इतके वाढले आहे. दोन महिन्यांपासूनच्या कोरोना लॉकडाऊनचा प्रभावदेखील मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या स्क्रीझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांवर होऊन त्याचे प्रमाण वाढण्याची भीती नाशिकमधील मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अत्यंत गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट स्वरूपाचा आजार म्हणून स्क्रीझोफ्रेनिया या मानसिक आजाराला ओळखले जाते. मात्र या आजारावर वेळीच औषध उपचार आणि मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्यास त्यातून पूर्णपणे बरे होणे देखील शक्य असल्याचे तज्ञांचे मत आहे. आपल्याबाबत सतत कोणीतरी कुभांड रचत आहे , अन्य माणसे सतत आपल्याबाबतच काही ना काही कुजबुजत आहेत, चित्रविचित्र आवाज सातत्याने येणे, ते भास नसून खरेच आवाज असल्याची खात्री वाटणे, सतत नैराश्यग्रस्त आणि चिडचिडेपणा येणे यासह अनेक लक्षणे आजाराने ग्रस्त नागरिकांमध्ये दिसू लागतात. कुटुंबात आई, वडील, काका, मामा किंवा अन्य जवळच्या नात्यातील कुणाला अशा स्वरूपाचा आजार असल्यास वंशपरत्वे आलेल्या जनुकांमध्ये त्याची कारणे असतात. अशा मूळ बीजाला सततचा ताणतणाव असह्य झाल्याने मानसिक आजाराला खतपाणी मिळून तो वेगाने फोफावतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने तसेच नातेसंबंधांमध्ये देखील गुंतागुंत वाढल्याने स्क्रीझोफ्रेनिया रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
उपचारांनी पूर्णपणे बरा होतो
या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्क्रीझोफ्रेनिया हा गंभीर स्वरूपाचा आजार असला तरी तो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होतो त्यामुळे समस्याग्रस्त रुग्णांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावे.
डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ
रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढते
गत दोन दशकांमध्ये या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढते राहिले आहे. पूर्वी हजार नागरिकांमागे एक रुग्ण असलेले प्रमाण आता अधिक वेगाने वाढत आहे. परंतु उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सामान्य जीवन जगू शकतो.
डॉ. जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञ