एक महिला नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात प्रसुतीसाठी आली. तिला दाखल करून घेण्यात आले. तिने बाळाला जन्म दिला आणि जी माहिती समोर आली, त्यानंतर पतीसह तिचे आई वडिलही कायद्याच्या कचाट्यात अडकले. पोलिसांनी पतीविरोधात बलात्काराचा, तर आईवडिलांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाशिक रोड मनपाच्या बिटको रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या विवाहितेने बाळाला जन्म दिला. माहिती भरून घेत असताना तिचे वय विचारले गेले. ती विवाहिता वयाची अठरा वर्षे पूर्ण नसल्याचे उघडकीस आले. मागील वर्षी मे महिन्यात तिच्या आई, वडिलांनी एका युवकासोबत लग्न लावून दिले होते.
या प्रकरणी तिच्या पतीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आणि आई, वडील, सासू-सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह कायद्यांतर्गत व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पॉक्सो) नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन विवाहिता ही गरोदर असल्याने प्रसूतीसाठी बिटको रुग्णालयात दाखल झाली. तिने २८ जून रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर, जन्म देणारी विवाहिता ही अल्पवयीन असल्याचे आणि तिचे सोळाव्या वर्षी लग्न लावून दिल्याची बाब समोर आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.