राज ठाकरे यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:22 IST2018-11-16T23:08:39+5:302018-11-17T00:22:41+5:30
मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी पाठपुरावा करून पांडवलेण्याजवळ वनखात्याच्या वनौषधी उद्यानात सुरू केलेल्या लेझर शोला ग्रहण लागले असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून तो बंद आहे.

राज ठाकरे यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ला टाळे
नाशिक : मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी पाठपुरावा करून पांडवलेण्याजवळ वनखात्याच्या वनौषधी उद्यानात सुरू केलेल्या लेझर शोला ग्रहण लागले असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून तो बंद आहे. लेझर यंत्रणेतील तांत्रिक दोष शोधण्याच्या कामासाठी पाच लाख रुपये संबंधित एजन्सीला द्यावे लागणार आहे. परंतु लेझर शोच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपये कमविणाऱ्या वनखात्याकडे एजन्सीला देण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तरतूद नसल्याने हा घोळ झाला आहे.
राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मोजकेच, परंतु आगळेवेगळे प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले. त्याअंतर्गत पांडवलेण्याच्या पायथ्याशी वनखात्याच्या वनौषधी उद्यानात लेझर शो राबविण्याचे ठरविले होते. वनखात्याकडून जागा मिळण्यात अनेक अडचणी आल्यानंतरही त्यांनी पाठपुरावा करून ही जागा विकासासाठी ताब्यात घेतली आणि टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून लेझर शो साकारला. वृक्षांचे अरण्यरुदन असलेला हा शो खूपच चर्चेत ठरला असताना वनखात्याची सुटी तर कधी पावसाळा अशा कारणातून तो बंद असतो. कित्येकदा तांत्रिक बिघाडामुळेही तो बंद पडत आहे. आताही गेल्या वर्षभरापासून तो बंद असून, त्यामुळे मनसे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.
महापालिकेच्या प्रशासनाला त्यांनी साकडे घातल्यानंतर वनखात्याशी संपर्क करण्यात आला. मात्र दुरुस्ती करणाºया एजन्सीला पाच लाख रुपये द्यावे लागणार असून मग ही संस्था बिघाड शोधेल आणि त्यानंतर दुरुस्तीची कामे करावी लागणार आहे. वनखात्याकडे त्यासाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे अडचण झाली असून, आता त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.
शासनाकडून पाच लाख रुपये मिळाले, तर हा प्रकल्प सुरू होईल अन्यथा गोदापार्कप्रमाणेच राज ठाकरे यांचा हा प्रकल्पही पाण्यात जाण्याची शक्यता आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी अडचण
लेझर शोसाठी तिकीट असून, त्या माध्यमातून आत्तापर्यंत वनखात्याला सुमारे ८० लाख रुपये मिळाले आहेत. परंतु लेझर शोच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही वेगळे खाते नाही की लेखाशीर्ष नाही त्यामुळे अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.