नाशिक मनसेत धाकधूक; राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता, पण 'बदला'पूर पॅटर्नची भीती

By धनंजय रिसोडकर | Published: May 19, 2023 01:44 PM2023-05-19T13:44:02+5:302023-05-19T13:55:54+5:30

नाशिकमध्येदेखील अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आला असल्याने काही पदाधिकारी निघून गेले, काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यातून लक्ष काढून घेतले आहे.

Raj Thackeray to visit Nashik, may take action against internal conflict in MNS | नाशिक मनसेत धाकधूक; राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता, पण 'बदला'पूर पॅटर्नची भीती

नाशिक मनसेत धाकधूक; राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता, पण 'बदला'पूर पॅटर्नची भीती

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पक्षांतर्गत गटबाजीमुळे गत आठवड्यात बदलापूर, उल्हासनगर शहराची कार्यकारिणी राज ठाकरे यांनी बरखास्त केली होती. त्यामुळे आजपासून (दि. १९) राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कार्यकारिणीचेही ‘बदला’ पूर होणार की जैसे थे परिस्थितीच कायम ठेवून केवळ वरवरची मलमपट्टी केली जाणार ? याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये धाकधुकीसह उत्सुकता कायम असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.

बदलापूर आणि उल्हासनगर शहरांच्या दौऱ्यावर असतानाच ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे १९ पासून चार दिवस नाशिक दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्यातही नाशिकमधील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर ‘बदला’पूर पॅटर्न राबविणार का? अशी चर्चा मनसेच्या वर्तुळात आहे. राज यांनी रविवारी बदलापूर, उल्हासनगरच्या दौऱ्यावर असतानाच तेथील कार्यकारिणी बरखास्त करीत १० दिवसांत नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याची घोषणा केली.

नाशिकमध्येदेखील अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आला असल्याने काही पदाधिकारी निघून गेले, काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यातून लक्ष काढून घेतले आहे. काही पदाधिकारी केवळ नामधारी पदे भूषवत असून, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, विविध प्रश्नांवर आंदोलने करण्यासही तयार नसल्याची बाब अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत गत दौऱ्यावेळी उघड झाली होती. राज यांच्या कामाची पद्धत पाहता ते नाशकातील परिस्थिती आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी पाहता बदलापूरसारखाच नाशिकचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना शहर, जिल्ह्याच्या परिपूर्ण कार्यकारिणीत बदल घडल्यास त्या निर्णयाचे काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून स्वागत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहराध्यक्ष पदासाठी काही जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांची नावे तसेच काही नवीन पदाधिकाऱ्यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

आजपासून घडामोडी

शुक्रवारी (दि. १९) राज ठाकरे हे सायंकाळी इगतपुरीत दाखल होऊन रात्री नाशिकमध्ये दाखल होणार आहेत . त्यानंतर उद्या, शनिवारी सकाळी ८:३० पासूनच राज हे शाखा अध्यक्षांसमवेत बैठका घेणार आहेत. सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद तसेच त्यानंतर ११ वाजता शहर उपाध्यक्षांसमवेत बैठक, त्यानंतर विभाग अध्यक्षांसमवेत बैठक, दुपारी १२ वाजता शहर कार्यकारीणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, दुपारी १ वाजता महिला सेना पदाधिकारी बैठक, तर सायंकाळी ६ वाजता निमा पॉवर प्रदर्शनास भेट देणार आहेत. त्यानंतर रविवारी सकाळी ९ वाजता शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांसह बैठक, १० वाजता क्रेडाई संघटना पदाधिकाऱ्यांसह बैठक, १०:३० वास्तुविशारद संघटना बैठक, तर ११ वाजता ग्रामीण पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेणार आहेत.

Web Title: Raj Thackeray to visit Nashik, may take action against internal conflict in MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.