नाशिकरोडला पावसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:53 IST2018-06-21T00:53:03+5:302018-06-21T00:53:03+5:30
मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात बुधवारी दुपारी मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून व छोट्या-मोठ्या फांद्या तुटून वाहनांवर व रस्त्यावर पडल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता.

नाशिकरोडला पावसाने नुकसान
नाशिकरोड : मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात बुधवारी दुपारी मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून व छोट्या-मोठ्या फांद्या तुटून वाहनांवर व रस्त्यावर पडल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने जनजीवन विस्कळीत होऊन रस्ते निर्मनुष्य झाले होते. रस्त्यांच्या बाजूने पावसाचे पाणी वाहत होते. तर अनेक ठिकाणी खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित झाला होता. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे बिटको चौकात दर्शन हॉटेलजवळ राजू धुर्जड यांची स्विफ्ट कार (एमएच १५, डीसी २२४४) वर मोठी फांदी तुटून पडली होती. यामध्ये सुदैवाने गाडीचे मोठे नुकसान झाले नाही. डीजीपीनगर येथील टागोरनगरमध्ये ओरिएंट बंगल्याचे आवारातील गुलमोहराचे झाड उन्मळून बंगल्यावर पडले होते. जेलरोड नारायणबापू चौक गोदावरी सोसायटीच्या रस्त्यावर कडेला असलेले झाड मारुती गाडी (एमएच १५ ईबी ७०१०)वर पडल्याने गाडीचे नुकसान झाले असून, त्याबरोबर पथदीपाचा खांबदेखील जमीनदोस्त झाला होता. जेलरोड सिद्धेश्वरनगर श्री दुर्गामाता मंदिर,कॅनॉलरोड, श्रमिकनगर, सैलानी बाबा चौक, नांदूरनाका, मॉडेल कॉलनी, पंचक मलनिस्सारण केंद्र आदी ठिकाणी झाडे उन्मळून व झाडांच्या छोट्या-मोठ्या फांद्या तुटून पडल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता.