इगतपुरीत रिसॉर्टमध्ये 'दम मारो दम'; महिलांचाही सहभाग, हुक्का पार्टीवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 12:45 IST2022-03-14T12:41:55+5:302022-03-14T12:45:02+5:30
मुंबईतील नागरिकांसह ७५ जणांना पकडले

इगतपुरीत रिसॉर्टमध्ये 'दम मारो दम'; महिलांचाही सहभाग, हुक्का पार्टीवर छापा
इगतपुरी (नाशिक) : त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत २० तरुणींसह ७५ जणांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. यामध्ये मुंबईसह विविध राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. सोबत १८ देहविक्रय करणाऱ्या महिलांनाही ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसाॅर्ट येथे अमली पदार्थांसह हुक्का पार्टीचे रेवती हार्डवेअर स्पेअरपार्ट या कंपनीमार्फत आयोजन करण्यात आल्याची खबर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. तसेच मुंबईहून देहविक्रय करणाऱ्या १८ तरुणींनाही तेथे आणण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास काही पंचांना हॉटेलमध्ये पाठवून खात्री करून घेतली. ही माहिती खरी असल्याचे लक्षात येताच पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
पार्टी हाॅलमध्ये विविध टेबलवर हुक्क्यासह मद्यसेवन करताना काही पुरुष व महिला आढळून आल्या. पोलिसांनी यावेळी ५५ पुरुष व २० महिलांना हुक्का व अमली पदार्थांचे सेवन करताना ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणावरून पोलिसांनी विदेशी दारू, हुक्के, सुगंधी तंबाखू आदी मुद्देमाल हस्तगत केला. तसेच एका खोलीची तपासणी केल्यावर तेथे एक पुरुष व एक महिला आढळून आली.
महिलेची चौकशी केल्यावर तिने मुंबईहून शिल्पा ऊर्फ शालीहा सिराज कुरेशी व दीपाली महेश देवळेकर यांनी १५ ते २० मुलींना देहविक्रीसाठी येथे आणल्याचे सांगितले. पोलिसांनी हुक्का, सिगारेट व तंबाखू उत्पादने व अनैतिक व्यापार प्रतिबंधक आदी नियमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयात आज हजर करणार-
पोलिसांनी हॉटेल मालक मनीष नयन झवेरिया (रा. विलेपार्ले, मुंबई), महेंद्र डोसाभाई मोमाया शाह (रा. शरणपूररोड, नाशिक) तसेच आयोजक आशीष नरेंद्र छेडा (रा. दहिसर, मुंबई), केतन चापसी गडा (रा. कांदिवली, मुंबई) यांच्यासह देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या शालिहा ऊर्फ शिल्पा सिराज कुरेशी (रा. जांबोरी मैदान, मुंबई) व दीपाली महेश देवळेकर (रा. गोरेगांव, मुंबई) यांच्यासह ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सोमवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.