नीलकंठेश्वर मंदिराचा संरक्षित वारसा होतोय असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:27 IST2019-04-21T00:27:22+5:302019-04-21T00:27:42+5:30
सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे,

नीलकंठेश्वर मंदिराचा संरक्षित वारसा होतोय असुरक्षित
नाशिक : सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, मात्र मंदिराचा हा प्राचीन वारसा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अद्याप पावले उचलली नसल्याने मंदिराची काळानुरूप पडझड होत आहे.
नीलकंठेश्वर महादेव मंदिराचा इतिहास हा अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची वास्तू जनकराजाकालीन असल्याचा उल्लेख १८८३ च्या मुंबई प्रेसिडेन्सी गॅझिटीयरमध्ये आढळतो. या मंदिराबाहेर दशश्वमेघ कुंड गोदापात्रात आहे. या कुं डाभोवती ब्रह्मदेवाने दहा अश्वमेध यज्ञ केल्याची आख्यायिका आहे. २०१४-१५ साली राज्य पुरातत्त्व विभागाने काही प्रमाणात दुरुस्तीचे काम केले होते, त्यानंतर मात्र या विभागाचे मंदिराकडे दुर्लक्ष झाले. नीलकंठेश्वर मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. या मंदिराचे आकर्षण आणि भुरळ चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यांनाही पडली आहे. अभिनेता सैफअली खानचा बुलेट राजा असो किंवा आमीरखानचा ‘पीके’ या दोन्ही हिंदी चित्रपटांमधील काही दृश्ये या मंदिराभोवतीची आहेत. नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या वास्तूच्या पाषाणावर करण्यात येत असलेले नक्षीकाम तुटले असून, काही पाषाणही ढासळत आहेत. मंदिरावर पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे काही झाडांची रोपेही उगविल्याचे दिसते. मंदिराचे पाषाण सुरक्षित व्हावे, यासाठी सिंहस्थ कुंभमेळा काळात रासायनिक प्रक्रिया पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आली होती. मंदिराचे गर्भगृहाचे शिखरसह दोन घुमट आहेत. संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात बांधण्यात आले आहे. मंदिराची अवस्था प्रथमदर्शनी चांगली वाटत असली तरी बारकाईने निरीक्षण केल्यास मंदिराच्या वास्तूवरील नक्षीकाम ढासळत असल्याचे लक्षात येते. मंदिराची वेळोवेळी दुरुस्ती केल्यास पडझड रोखण्यास प्रशासनाला यश येईल.
...तर दुर्घटना घडू शकते
नीलकंठेश्वरच्या ‘सावली’ला ज्येष्ठ विश्रांतीला असतात. त्यामुळे अचानकपणे मंदिराच्या नक्षीचे दगड ढासळले तर दुर्घटना घडू शकते. या मंदिराच्या पाषाणावरील नक्षीकाम ढासळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने या मंदिराला सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.