नाशिक शहरातील आठवडे बाजारांच्या जागांचा अन्य दिवशी वापराचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 18:44 IST2017-11-28T18:42:21+5:302017-11-28T18:44:59+5:30
शहर सुधार समिती : उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना
नाशिक शहरातील आठवडे बाजारांच्या जागांचा अन्य दिवशी वापराचा प्रस्ताव
नाशिक - शहरात गंगेवरील बाजारासह ज्याठिकाणी आठवडे बाजार भरतात, त्याच्या इतर दिवशीही सदर जागांचा वापर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधार समितीच्या बैठकीत चर्चिला गेला. सदर जागा लिलाव पद्धतीने देऊन त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे पुढील सभेला सविस्तर माहिती ठेवण्याचे आदेश सभापती भगवान दोंदे यांनी दिले.
शहर सुधार समितीच्या बैठकीत, सत्यभामा गाडेकर यांनी आठवडे बाजारपेठांसाठी असलेल्या जागा उर्वरित दिवसांसाठीही वापरण्यास देण्यासाठी धोरणात्मक निर्णयाकरीता प्रस्ताव मांडला. यावेळी गाडेकर यांनी सदर जागांच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकणार असल्याचे सांगितले. पंडित आवारे यांनी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना उर्वरित दिवशी आठवडे बाजारच्या जागांवर स्थलांतरीत करण्याची सूचना केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही रस्त्यावरील विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. स्वाती भामरे यांनी महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था गंभीर असल्याचे सांगत त्याची सविस्तर माहिती मागविली. सार्वजनिक शौचालयांची साफसफाईच होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले तर आवारे यांनी ज्याठिकाणी उत्पन्न मिळते, तेथेच सुलभचे लोक लक्ष घालत असल्याची तक्रार केली. गाडेकर यांनी केअर टेकर म्हणून महिला बचत गटांना काम देण्याची सूचना केली. गाडेकर यांनी, शहरातील सार्वजनिक शौचालये, महापालिका शाळा, रुग्णालये यांच्या इमारतींच्या भिंतींवर आरोग्यविषयक संदेश लिहिण्याची सूचना केली. परंतु, बांधकाम विभागाने सदर काम हे आरोग्य विभागाचे असल्याचे सांगताच गाडेकर यांनी या टोलवाटोलवीबद्दल अधिकाºयांना धारेवर धरले. रस्त्यांवरील पादचारी मार्ग आणि दुभाजकांच्या स्वच्छतेबाबतचा प्रस्ताव सतिश कुलकर्णी यांनी समितीला दिला होता. त्यानुसार, सभापतींनी स्वच्छतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केले. स्वाती भामरे यांनी रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये बोगनवेल न लावण्याची सूचना केली. यावेळी प्रभारी उद्यान अधिक्षक महेश तिवारी यांनी बोगनवेलसह कोणत्याही काटेरी झाडांची लागवड केली जात नसून त्याऐवजी लिलीच्या वृक्षांची लागवड केली जात असल्याचे स्पष्ट केले.
इन्फो
अवघे चार सदस्य उपस्थित
शहर सुधार समितीच्या मागील सभेला अधिकारी उपस्थित नसल्याने सभा गुंडाळावी लागली होती. मंगळवारी झालेल्या सभेला सभापतीसह अवघे चारच सदस्य उपस्थित होते. उर्वरित पाच सदस्यांना वारंवार दूरध्वनी करुनही त्यांनी त्याकडे पाठ फिरविली. विषय समित्यांच्या सभांना प्रशासनही गांभीर्याने घेत नसल्याने सदस्यांनीही समितीला गांभीर्याने न घेण्याचे ठरविल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली.