सुरगाणा तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

By Admin | Updated: June 23, 2015 01:46 IST2015-06-23T01:45:30+5:302015-06-23T01:46:13+5:30

सुरगाणा तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

Proposal for departmental inquiry of Surgana Tehsildar | सुरगाणा तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

सुरगाणा तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

नाशिक : सुरगाणा तहसीलदार सुदाम महाजन यांनी नांदगाव येथे कार्यरत असताना नवीन शर्तीच्या जमीन खरेदी-विक्रीसाठी बेकायदेशीर अनुमती देऊन शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, यासंदर्भात अपर जिल्हाधिकाऱ्यांकरवी त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. हा प्रस्ताव आल्यानंतर शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार आहे. गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला अनुमती देण्यासाठी विभागीय आयुक्तांचे अधिकार तहसीलदार महाजन यांनी स्वत:च वापरून शासनाला कोट्यवधी रुपयांच्या नजराणा रकमेला मुकावे लागले होते. नांदगाव तालुक्यात सुमारे ५० हून अधिक अशा स्वरूपाच्या व्यवहाराला महाजन यांनी अनुमती दिल्याने त्याची प्राथमिक चौकशी अपर जिल्हाधिकाऱ्यांकरवी करण्यात आली असता त्यात महाजन यांचे कृत्य बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला व तसा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेऊन जिल्हाप्रशासनाने महाजन यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून म्हणणे जाणून घेतले; परंतु त्यात समाधान न झाल्याने महाजन यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात येऊन विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीने महाजन यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविणे अपेक्षित धरण्यात आलेले असून, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाजन यांच्यावरील पुढील कारवाईसाठी राज्य सरकारला अवगत केले जाणार आहे. महाजन यांनी नवीन शर्तींच्या ज्या ज्या जमिनींच्या व्यवहारांना बेकायदेशीर अनुमती दिली, त्या जमिनी सरकार जमा करण्यात आल्या असून, जमीन मालकांना आता पुन्हा नव्याने मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे एकूणच महाजन यांचे यासंदर्भातील कार्यवाही पाहता विभागीय आयुक्तांनी त्यांची तडकाफडकी सुरगाणा येथे बदली केली आहे.

Web Title: Proposal for departmental inquiry of Surgana Tehsildar