नाशिकमध्ये मालमत्ता करात १ एप्रिलपासून वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:34 IST2018-03-29T18:34:50+5:302018-03-29T18:34:50+5:30
महापालिका : १८ टक्के दरवाढीने होणार वसुली
नाशिकमध्ये मालमत्ता करात १ एप्रिलपासून वाढ
नाशिक : महापालिकेने मालमत्ता करात १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी येत्या १ एप्रिल २०१८ पासून करण्यात येणार असून, सुधारित दरानेच मिळकतधारकांना घरपट्टीची बिले पाठविली जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेने चालू आर्थिक वर्षात २५३ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्याने थकबाकीदारांवर करडी नजर राहणार आहे.
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीने महासभेकडे पाठविलेल्या प्रस्तावात सुधारणा करत भांडवली मूल्यावर आधारित ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत घरपट्टी दरात वाढ सुचविली होती. परंतु, महासभेने आयुक्तांचा प्रस्ताव धुडकावून लावत भाडेमूल्यावर आधारित वसुलीला मंजुरी दिली होती. दरम्यान, घरपट्टी वाढीविरोधात राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला एक पाऊल मागे घेणे भाग पडले आणि स्थायी समितीचाच ठराव मान्य करत १८ टक्के दरवाढीला मान्यता दिली. त्यानुसार सर्वसाधारण करात ५ टक्के, सर्वसाधारण स्वच्छता करात ३ टक्के, जललाभ करात २ टक्के, मलनिस्सारण लाभकरात ५ टक्के, पथकरात २ टक्के तर मनपा शिक्षण करात १ टक्के याप्रमाणे १८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. या सुधारित दरानेच येत्या १ एप्रिलपासून घरपट्टीची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यानुसार बिले पाठविली जाणार आहेत. महापालिकेच्या वतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी सवलत योजना लागू केली आहे. यंदाही ही सवलत राहणार असून, सुधारित दराने नागरिकांना बिले अदा करावी लागणार आहेत.
२५३ कोटींचे उद्दिष्ट
आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकात घरपट्टी वसुलीचे २५३ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ११४ कोटींवर उत्पन्न अपेक्षित मानले जात आहे. यंदा मात्र, गतवर्षाच्या तुलनेत १३९.९७ कोटी रुपये वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे. त्यामुळे साहजिकच थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने कठोर मोहीम राबविली जाण्याचे संकेत मिळत आहेत.