समस्यांमुळे नवनिर्मितीस चालना मिळते : संदीप शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:43 IST2019-07-09T00:43:31+5:302019-07-09T00:43:49+5:30
स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते.

समस्यांमुळे नवनिर्मितीस चालना मिळते : संदीप शिंदे
सातपूर : स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते. त्यामुळे समस्यांकडे नकारात्मकतेने न बघता त्यातून मार्ग काढत परिणामकारकता कशी साध्य करता येईल याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक टीसीएस इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख संदीप शिंदे यांनी केले.
अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात निमा जीआयझेड आयएफसीतर्फे आयोजित ‘इनोव्हेशन कॅम्प’मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जीआयझेडचे तंत्रज्ञ तसव्वर अली यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असून ‘स्टुडंट इनोव्हेशन प्रोजेक्ट’ च्या माध्यमातून उद्योगातील विविध प्रक्रिया व त्यात येणाऱ्या विविध समस्या सोडविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक काळातच विकसित होण्यास मदत होते. उद्योजक मनीष रावल यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून उत्पादन व संबंधित प्रक्रियांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल अशा तांत्रिक विकल्पांची माहिती मिळाल्याचे मनोगतात सांगिलते. प्रास्ताविक निमा जीआयझेड आयएफसीचे समन्वयक श्रीकांत बच्छाव यांनी केले. परीक्षित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी कमलेश नारंग, समीर पटवा, मितेश पाटील, अखिल राठी, श्रीपाद कुलकर्णी, उदय रकिबे तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योजक व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
३० प्रकल्प सादर
या उपक्रमातील पहिल्या टप्प्यात तीन महाविद्यालयातील ११३ विद्यार्थ्यांच्या गटाने एकूण ३० प्रोजेक्ट्स केले. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत उत्पादन व प्रक्रियांमध्ये नवनिर्मितीस चालना मिळावी यासाठी निमा व शैक्षणिक संस्था यांच्या प्रयत्नांची माहिती दिली.