नाशिकमध्ये खुन्नसवरून कैद्यांनी मध्यरात्री तुरुंगातच केला राडा; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:55 IST2025-03-10T15:55:22+5:302025-03-10T15:55:58+5:30
आरोपींच्या टोळक्याने खुन्नस धरून घेराव घालत लाकडी दंडुक्याने मारहाण केली.

नाशिकमध्ये खुन्नसवरून कैद्यांनी मध्यरात्री तुरुंगातच केला राडा; एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या टोळक्याने एका बंदीवानावर हल्ला चढवून त्यास गंभीर मारहाण केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. ही घटना आठवडाभरापूर्वी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कैद्याने दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात २०२१ सालापासून न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात असलेला आरोपी संशयित सागर ऊर्फ पंकज बाजिरा चौधरी (२५, रा. कुसुंबा) यास आरोपी पॉल व त्याचे साथीदार असलेले वाघमारे, दिनेश चव्हाण, लाला, मामा (बंदी असलेला कैदी), वाजीद, महाजन, अमोल, मोहन (कैदी, पूर्ण नाव माहीत नाही) यांनी दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मारहाण केली. तसेच बळजबरीने भत्ता खाऊ घालून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चौधरी याने या प्रकाराबाबत कारागृह अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे या आरोपींच्या टोळक्याने पुन्हा त्याच्याविरुद्ध खुन्नस धरून घेराव घालत लाकडी दंडुक्याने मारहाण केली. तसेच तीन महिन्यांची ७,५०० रुपयांची मनी ऑर्डरदेखील लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
डोके भिंतीवर आपटून फोडले
रुमाल गळ्याभोवती आवळून ओढत त्याचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे याबाबत चौधरी याने तक्रार केली. मात्र, त्याचे काहीही ऐकले नाही. या सर्व त्रासाला कंटाळून चौधरी याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुमाल गळ्याभोवती आवळून ओढत त्याचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे याबाबत चौधरी याने तक्रार केली. मात्र, त्याचे काहीही ऐकले नाही, या सर्व त्रासाला कंटाळून चौधरी याने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.