जिल्ह्यातील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:14 IST2018-10-18T01:12:55+5:302018-10-18T01:14:08+5:30
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन शासनाकडे सादर केली आहे.

जिल्ह्यातील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादर
नाशिक : जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ठरविलेल्या निकषानुसार गेल्या चार दिवसांत आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये पथकाने प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील पीक परिस्थितीची माहिती आॅनलाइन शासनाकडे सादर केली आहे. सदरची माहिती शासनाकडे रवाना झालेली असली तरी, तीन तालुक्यांची मंत्र्यांकडून पाहणीच झाली नसल्याने त्यासाठी जलसंधारण मंत्री राम शिंदे हे लवकरच भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्यामुळे व त्यातही तो सलग न पडल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. आॅगस्टच्या अखेरीस काही तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाने खरिपाच्या काही पिकांना जीवदान मिळाले.
परंतु अन्य तालुक्यांमध्ये पाऊस न पडल्याने पिकांवर वाईट परिणाम झाला. आॅगस्टनंतर पावसाने दडीच मारल्याने यंदा आॅक्टोबरमध्येच पाण्याचे दुर्भीक्ष जाणवू लागले आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन खरीप पिकांचे उत्पादनही घटल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी होत असल्याने सरकारने त्याची दखल घेत सर्वच पालकमंत्र्यांना जिल्ह्णांच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले होते तर दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पर्जन्यमान, जमिनीची आर्द्रता, पीक परिस्थिती या तांत्रिक बाबी तपासण्याच्या सूचना कृषी, महसूल व भूजल विभागाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील चांदवड, नांदगाव, येवला, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक या आठ तालुक्यांची शासनाने निवड करून, त्यातील दहा टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची माहिती व त्याचे छायाचित्रे घेऊन ती आॅनलाइन पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण व देवळा या पाच तालुक्यांचा दौरा केला उर्वरित तीन तालुक्यांची पाहणी जलसंधारणमंत्री राम शिंदे करणार आहेत. तत्पूर्वी शासकीय पथकाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांतील ९३ गावांमध्ये भेटी देऊन आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.
जिल्ह्णात ५७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
सिन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने आणखी चार टॅँकर नव्याने मंजूर करण्यात आले असून, एकट्या सिन्नर तालुक्यात १७ तर जिल्ह्णात ५७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणत: २५० गावे, वाड्यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.