वीज, पाण्यावाचून नाशिककर बेहाल; उष्म्याच्या तीव्रतेत पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:17 IST2018-05-05T21:17:21+5:302018-05-05T21:17:21+5:30
महावितरण कंपनीने शनिवारी जाहिर निवेदनाद्वारे शहरातील १५ उपकें द्रांवरुन सकाळी आठ व दहा वाजेपासून वीजपुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली.

वीज, पाण्यावाचून नाशिककर बेहाल; उष्म्याच्या तीव्रतेत पडली भर
नाशिक : महावितरणने अचानकपणे शनिवारी (दि.५) वीज वाहिन्यांची दुरूस्ती व नवीन कामांच्या निमित्ताने शहरातील सर्वच उपकेंद्रांवरुन विविध उपनगरीय भागांमध्ये होणारा वीजपुरवठा कमाल आठ तास तर किमान तीन तास खंडीत केल्याने नागरिकांचे हाल झाले. वीजपुरवठा खंडित राहिल्याने गंगापूर धरणावरुन पंपीगही होऊ शकले नाही, त्यामुळे सकाळी काही भागात अपुरा पाणीपुरवठा तर काही भागात दुपारी व संध्याकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
महावितरण कंपनीने शनिवारी जाहिर निवेदनाद्वारे शहरातील १५ उपकें द्रांवरुन सकाळी आठ व दहा वाजेपासून वीजपुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली. वीजपुरवठा खंडीत होण्याामागे दुरूस्तीचे कारण जरी देण्यात आले असले तरी ऐनवेळी शनिवारी सकाळी वर्तमानपत्रातून महावितरणकडून वीजपुरवठा खंडीत होणार असल्याबाबत सूचना निवेदनाद्वरे दिली गेली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. वीजपुरवठा खंडीत केल्याचा कालावधी अधिक असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सकाळपासून तर दुपारपर्यंत नागरिकांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ वीजपुरवठ्याला मुकावे लागले. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले. शहराच्या कमाल तपमानाचा पारा शनिवारी ३८.७ इतका होता. वीज गायब राहिल्याने उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवली. उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांना पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रे घरात असूनदेखील त्याचा वापर करता आला नाही. अनेकांचे मोबाईलदेखील बंद पडले. मोबाईलच्या बॅटऱ्यांमधील ऊर्जा संपल्याने नागरिकांचा ‘संपर्क’ही कमकुवत झाला होता.
उपकेंद्रनिहाय वेळ व प्रभावीत परिसर
देवळाली कॅम्प- सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या केंद्रावरुन आनंदरोड ते धोंडीरोड शिंगवे बहुल्यापर्यंत परिसर.
सातपूर - सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत या केंद्रावरुन गंगापूर गाव ते शिरीन मेडोजपर्यंत.
दत्तमंदीर- सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या केंद्रावरुन जगताप मळा ते के.जे मेहता शाळेच्या परिसर.
उपनगर- दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत या केंद्रावरुन गांधीनगर ते रामदास स्वामीनगर पर्यंत.
पंचक- दोन उपकेंद्रांवरुन सिन्नरफाटा ते जेलरोडपर्यंत सर्वच भागात तीन ते सात तास वीजपुरवठा नव्हता.
मखमलाबाद- उपकेंद्रावरुन मखमलाबाद गाव ते पेठरोडचा परिसर
टाकळी- सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत वडाळानाका ते काठेगल्ली परिसर.
शिवाजीवाडी-सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बोधलेनगर, अशोका मार्ग, साईनाथनगर, इंदिरानगर ते रविशंकर मार्गसह वडाळागाव परिसर.