पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम या राज्यांत पाठविल्या जाणाऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सध्या डाळिंबाला कमीत कमी तीस ते पन्नास रुपये असा बाजारभाव मिळत आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात संगमनेर, अहमदनगर भागातून सध्या काही प्रमाणात डाळिंब मालाची आवक होत आहे. पेठरोडवरील फळबाजारातून डाळिंबाची दैनंदिन परराज्यात निर्यात केली जाते. मात्र थंडीमुळे मालाला उठाव नसल्याने अत्यंत कमी प्रमाणात परराज्यात माल पाठविला जात आहे. उत्तर भारतात थंडी जाणवू लागल्याने थंडीचा परिणाम डाळिंब मालावर जाणवत आहे. थंडीमुळे उठाव कमी असल्याने मागणीदेखील घटली असून, बाजारभाव घसरले आहे, असे डाळिंब व्यापारी सुभाष अग्रहरी यांनी सांगितले. आगामी काही दिवस परराज्यातील थंडीची लाट कायम राहिल्यास डाळिंब मालाचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.
थंडीच्या लाटेने डाळिंबाच्या दरात मोठी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:20 IST