हिरे-भुजबळ कुटुंबीयांचा राजकीय वर्चस्ववाद 

By श्याम बागुल | Published: January 25, 2020 04:54 PM2020-01-25T16:54:43+5:302020-01-25T16:57:43+5:30

मांजरपाडा प्रकल्पाची खरी संकल्पना हिरे कुटुंबीयांची असल्याची व नंतर हा प्रकल्प छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्ष पळविल्याची केलेली लाडीक तक्रार पाहता, राजकीय घराण्यांमधील चढाओढ लक्षात यावी.

The political supremacy of the diamond-Bhujbal family | हिरे-भुजबळ कुटुंबीयांचा राजकीय वर्चस्ववाद 

हिरे-भुजबळ कुटुंबीयांचा राजकीय वर्चस्ववाद 

Next
ठळक मुद्दे छगन भुजबळ यांनी लावलेली हजेरी ही उपस्थितांच्या भुवया उंचावणारी होतीभुजबळ यांची कर्मभूमी म्हणूनच नाशिकची नव्याने ओळख निर्माण झाली.

श्याम बागुल
एक घराण्याकडे प्रस्थापित राजकीय वारसा तर दुसऱ्याकडून स्वकर्तृत्वावर वारसा प्रस्थापित करण्याचा सुरू असलेला प्रयत्न, विशेष म्हणजे दोघांनीही निवडलेली भूमी एकच. त्यामुळे ज्या ज्या वेळी दोघेही समोर उभे ठाकले त्या त्या वेळी संघर्ष व एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न झाले तर नवलच. हे सारे कथन करण्याचे निमित्त ठरले ते माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या वाढदिवसाच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पाताई हिरे यांचा अभीष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. व्यासपीठावर राष्टÑवादी व कॉँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय असली तरी, छगन भुजबळ यांनी लावलेली हजेरी ही उपस्थितांच्या व हिरेंच्या आप्तस्वकीयांच्या दृष्टीने काहीशी भुवया उंचावणारी होती व त्याचे प्रत्यंतरदेखील लागलीच प्रास्ताविक करताना आले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे पणतू असलेले माजी आमदार अपूर्व हिरे यांनी घराण्याचा वारसा व राज्य, जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची गाथा कथन करताना मांजरपाडा प्रकल्पाची खरी संकल्पना हिरे कुटुंबीयांची असल्याची व नंतर हा प्रकल्प छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्ष पळविल्याची केलेली लाडीक तक्रार पाहता, राजकीय घराण्यांमधील चढाओढ लक्षात यावी.


स्वातंत्र्यपूर्वकाळातील चळवळीत सक्रिय सहभागी झालेले कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे महत्त्व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कायम राहिले. त्यातून राज्यातील कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांचा वावर जसा कायम राहिला तसेच त्यांच्या कर्तृत्वाने स्व. यशवंतराव, मोरारजी देसाई यांच्यासोबत त्यांचेही नाव घेतले जाऊ लागले. राज्याच्या राजकारणात ज्यावेळी पोकळी निर्माण झाली त्यावेळी भाऊसाहेब हिरे यांच्याकडे स्वत:हून राज्याचे मुख्यमंत्रिपद चालून आले. त्यांनी ते स्वीकारले नाही हा भाग अलाहिदा. अशा कार्यकर्तृत्वाचा राजकीय वारसा सांगणा-या हिरे घराण्याच्या जन्म व कर्मभूमीत नवीन राजकीय घराण्याचा होऊ पाहणारा उदय कोणाच्या पचनी पडणार? हे राजकीय घराणे दुसरे, तिसरे कोणी नसून भुजबळ कुटुंबीयच आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. २००४ मध्ये जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेशकर्ते झालेले छगन भुजबळ यांनी जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्राला आपलेसे करून स्वत:ची ओळखच नाशिककर म्हणून राज्याला करून देण्याची जी काही धडपड चालविली ते पाहता, भुजबळ यांची कर्मभूमी म्हणूनच नाशिकची नव्याने ओळख निर्माण झाली. त्यामुळे काळानुरूप अस्तित्वासाठी झुंज देणारे हिरे घराणे व सर्वच क्षेत्र आपल्या कवेत घेण्यासाठी भुजबळ कुटुंबीयांची सुरू असलेली धडपड पाहता, त्यातून संघर्ष होणे अपेक्षित असले तरी, आजच्या घडीला ही दोन्ही घराणी शरद पवार यांच्या वळचणीला बांधली गेल्याने त्यांना व्यक्त होण्यास मर्यादा पडणेदेखील स्वाभाविकच आहे. परंतु पुष्पाताई हिरेंच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात मांजरपाडा प्रकल्पाच्या विषयावरून हिरे घराण्याचा भुजबळ यांच्याविषयी असलेला रोष लाडीक जरी ठरवला तरी, हिरे कुटुंबीयांची खदखद यानिमित्ताने बाहेर पडली असेच म्हणावे लागेल. हिरे कुटुंबीयांचे आप्तस्वकीय, विशिष्ट समाजाच्या हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत भुजबळ यांच्या भूमिकेवर घेण्यात आलेल्या आक्षेपावर गप्प बसतील ते भुजबळ कसले? मांजरपाडा प्रकल्पापेक्षाही पश्चिम वाहिन्यांचे गुजरात राज्यात वाहून जाणारे महाराष्टÑाच्या हक्काचे पाणी नाशिक जिल्ह्यात आणायचे अशा एकमेव हेतूने मांजरपाडा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगतानाच भुजबळ यांनी, त्यावेळी मालेगावी झालेल्या पाणी परिषदेची आठवण करून दिली. परंतु हिरे कुटुंबीयांचा नेहमीच आपल्याविषयी काहीतरी गैरसमज होतो असे सांगून भुजबळ यांनी जाहीर कार्यक्रमातून हिरे कुटुंबीयांच्या आप्तस्वकीयांसमोर स्वत:च्या निर्दोषत्वाची बाजू मांडण्याची संधी साधून घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या हिरे घराण्याच्या राजकीय वारसाचे पतन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत झाले. छगन भुजबळ यांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करावा व कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नातू प्रशांत हिरे यांचा निवडणुकीत पराभव व्हावा, या तशा योगायोगाच्या गोेष्टी असल्या तरी, एका घराण्याचा राजकीय हक्क हिरावून घेण्याची नियतीने खेळलेली खेळी व दुस-या घराण्याचा होत असलेला उदय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळून आल्या. या एकमेव घटनेतून हिरे-भुजबळ कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेचे तब्बल सोळा वर्षांनंतर स्पष्टीकरण करण्याची संधी हिरे कुटुंबीयांनी छगन भुजबळ यांना स्वत:हूनच उपलब्ध करून दिली. राज्यातील राष्टÑवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा भुजबळ यांच्या खांद्यावर असताना राष्टÑवादीचे उमेदवार प्रशांत हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला भुजबळ वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत त्यातून हिरे कुटुंबीयांची नाराजी ओढवून घेतलेल्या भुजबळ यांनी त्यामागची वस्तुस्थिती कथन केली. मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथे हेलिकॉप्टरने हवाईमार्गे निघालेल्या भुजबळ यांचे हेलिकॉप्टर भरकटून थेट मध्य प्रदेशाच्या सीमेवर जाऊन धडकले. परिणामी प्रशांत हिरे यांच्या प्रचारार्थ होणा-या भुजबळ यांच्या सभेसाठी जमलेल्या श्रोत्यांचा हिरमोड होऊन त्यातून थेट प्रशांत हिरे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भुजबळ यांनी हे सारे काही जाणूनबुजून केले, असा समज त्यावेळी पसरविला गेला अन् त्यातूनच निवडणुकीत पराभव झाल्याची हिरे कुटुंबीयांची धारणा झाली. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या हजेरीत आपल्या निर्दोषत्वाचे स्पष्टीकरण देऊन बाजू मांडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो हिरे कुटुंबीयांच्या किती पचनी पडला हे समजू शकले नसले तरी, निव्वळ भुजबळ प्रचारसभेला न आल्याने हिरे घराण्यातील उमेदवाराचा निवडणुकीत पराभव होऊ शकतो इतकी राजकीय ताकद हिरे कुटुंबीयांची क्षीण झाली असे मानायचे काय?

 

Web Title: The political supremacy of the diamond-Bhujbal family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.