विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नाशकात; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 09:15 IST2019-09-19T09:09:49+5:302019-09-19T09:15:45+5:30
मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडताना सुरक्षा यंत्रणा सभेच्या ठिकाणी दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नाशकात; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
नाशिक - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्वत: शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल होत पोलीस आयुक्त, पोलीस महानिरिक्षकांकडून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत सूक्ष्म नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत. मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरासह धुळे, जालना, सांगली, जळगाव यांसह विविध जिल्ह्यांचे सुमारे १२ बॉम्ब शोधक-नाशक पथक सर्व लवाजमा घेऊन दाखल झाले आहेत. या पथकांच्या जवानांनी तपोवनासह सभास्थळाचा मंगळवारपासूनच ताबा घेतला असून हा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. यासह गुन्हे शोध पथकाचे विशेष श्वान पथकदेखील मुंबई येथून शहरात दाखल झाले आहे. श्वानांच्या मदतीने सभास्थळाची बारकाईने पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे.
त्यानुसार मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडताना सुरक्षा यंत्रणा सभेच्या ठिकाणी दिसून येत आहे. मोदी यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाच्या कमांडोची (एसपीजी) तुकडी तैनात राहणार आहे. मंगळवारी सायंकाळपासून या दलाचे काही जवान तपोवानात दाखल झाले आहेत. तसेच विशेष सुरक्षा ग्रपू (एसपीयू), मुंबई फोर्स-१चे जवान, राज्य राखीव दलाची तुकडी, जलद प्रतिसाद पथकाचे जवान, दंगल नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्सचे जवानही बंदोबस्तावर तैनात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी सुरक्षा यंत्रणा अतिसतर्क आहे.
जयस्वाल यांनी मंगळवारी सकाळीच अकादमीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सुरक्षेची चोख व्यवस्था आणि बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार दुपारपासूनच मुंबई, ठाणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, सांगली, जालना, औरंगाबाद, दौंड आदी शहरांमधून आलेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना औरंगाबाद महामार्गावरील एका लॉन्समध्ये नांगरे पाटील, दोरजे यांनी या दोन्ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-याविषयीच्या बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपआयुक्त, उपअधिक्षक, अपर अधीक्षक, सहायक आयुक्त यांच्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांचे गट सोपवून बंदोबस्ताची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक अधिका-याला स्वतंत्र कर्मचा-यांचा गट दिला गेला आहे. प्रत्येक वरिष्ठ पोलीस अधिकाºयाच्या गटाचे तपोवन, साधुग्राम सभास्थळाचे विविध ‘लोकेशन’ निश्चित करून तेथे त्यांना तैनात करण्यात आले आहे.
सरकारी वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी
महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तातील ताफ्यातील सर्व चालकांची मंगळवारी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात वाहनचालक पोलिसांची गर्दी झाली होती. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा रुग्णालयदेखील सज्ज करण्यात आले असून रुग्णखाटा, रक्त, वैद्यकीय सोयीसुविधा साधने अद्ययावत ठेवण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांकडून व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीची सज्जताही सभेच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. महापालिका अग्निशमन विभागाचे केंद्रीय अधिकारी राजेंद्र बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक मेगा बाऊजर बंबासह जवान व्यासपिठाच्या लगत सज्ज आहेत. तसेच संपुर्ण व्यासपिठाला अग्निप्रतिरोधक रसायनाचे कवच प्राप्त करून देण्यात आले आहे.
मोदींचा नाशिक दौरा
सकाळी ११ वा. नरेंद्र मोदी भारतीय वायू सेनेच्या विमानाने ओझर विमानतळावर उतरतील.
दुपारी ११ :५५ वा. मोदी हेलिकॉप्टरद्वारे हिरावाडी मिनाताई ठाकरे स्टेडियमच्या हेलिपॅडवर उतरतील.
स्टेडियमवरून व्ही.व्ही.आय.पी ‘कॅन्वॉय’ अवघ्या पाच ते सात मिनिटांत साधुग्राम सभास्थळी पोहचेल.
दुपारी २.वा मोदी यांचे विमान ओझर विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने उड्डाण करेल.