छायाचित्र दिन : छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

By Admin | Updated: August 20, 2014 00:42 IST2014-08-20T00:31:52+5:302014-08-20T00:42:04+5:30

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट

Photo day: Response to the photo display | छायाचित्र दिन : छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

छायाचित्र दिन : छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

नाशिक : मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना बाहेर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वत:ला जाळून घेणारा युवक, साप-मुंगसाची लढाई, विहंगम गोदाघाट यापासून ते राजकारणाबाहेर मैत्रीचे बंध टिकवून ठेवणाऱ्या मुंडे-देशमुख यांचे दिलखुलास हास्य यांसह अनेकविध प्रसंग आपल्या कॅमेऱ्यातून टिपणाऱ्या वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन पाहून रसिकांना गदिमांच्या गीतरामायणातील ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ या ओळीची सहज आठवण झाली.
कुसुमाग्रज स्मारकात जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधत नाशिकमधील वृत्तपत्र छायाचित्रकार एकत्र आले आणि त्यांनी स्थापन केलेल्या नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे उद्घाटन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी कॅमेरा क्लीक करून केले. याचवेळी निवडक छायाचित्र प्रदर्शनही भरविण्यात आले होते. यावेळी छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देताना ओबीसी वित्तीय महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांनी छायाचित्रांचे प्रदर्शन मोठ्या स्वरूपात भरविण्याची इच्छा प्रदर्शित केली. याचबरोबर संघटनेने छायाचित्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचीही सूचना केली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी एरिअल फोटोग्राफीसंबंधी माहिती देत, लवकरच पांडवलेणीवरून दिसणाऱ्या फाळके स्मारकाची छायाचित्रे लोकांसमोर मांडणार असल्याचे सांगितले. महापौर यतिन वाघ यांनी छायाचित्रकारांच्या कौशल्याचे कौतुक करत महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी गांवकरीचे संपादक वंदन पोतनीस, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कोकरे यांनी, तर सूत्रसंचालन नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी केले. सचिन निरंतर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Photo day: Response to the photo display